810 शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा

0

प्रक्रिया मंदगतीने सुरू , सहकार खात्याचे डोेक्याला हात

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारची छत्रपती शिवाजी महाराज सन्मान याजनेची अंमलबजावणी कासव गतीने सुरू झाली आहे. पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता कुठे पात्र कर्जदारांची नावे अंतिम करून त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम टाकण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या एक हजार 338 कर्जदार शेतकर्‍यांच्या खात्यावर सुमारे नऊ कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. त्यात बुधवारी वाढ झाली असून आणखीन पात्र कर्जदार शेतकर्‍यांच्या 810 खात्यांवर कर्जमाफीची रक्कम भरण्यात आली आहे.
जुलै महिन्यात राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर दीड लाखापेक्षा कमी कर्ज असणारे, दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असणारे, नियमित कर्ज भरणारे, कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्यास सांगण्यात आले. ही प्रक्रिया करताना कधी कर्जमाफीचे अर्ज भरण्याचे सर्व्हर डाऊन तर कधी अन्य कारणामुळे कर्जदार शेतकर्‍यांची धावाधाव झाली. त्यानंतर सोसायटी पातळीवरून कर्जदार शेतकर्‍यांची माहिती घेण्यात आली. त्यानंतर हीच माहिती पुन्हा एक्सल सीटमध्ये सरकारला सादर करण्यात आली.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सरकारने कर्जदार शेतकर्‍यांची 1 ते 66 नमुन्यांतील माहिती मागवली. या माहितीच्या आधारे व ऑनलाईन यादीद्वारे आलेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या याद्याचे सरकारी लेखा परीक्षकांकडून पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा कर्जदार शेतकरी यांचे आईवडील, पॅन कार्ड, आधारकार्ड यासह त्यांच्या जन्मस्थळाची माहिती सरकारने मागवली होती.
कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी नोव्हेंबर उजाडला असून आतापर्यंत दोन हजार 146 शेतकर्‍यांच्या खात्यावर 18 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आले असल्याचे बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. लवकर पुढील प्रक्रिया राबवून आणखीन पात्र असणार्‍या शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कर्जमाफीच्या प्रक्रियेवरून सहकार खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त झाले असून कर्जदारांच्या याद्या तपासून तपासून त्यांनी आता डोक्याला हात लावला आहे. कधी प्रक्रिया संपणार असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

*