कर्जमाफीच्या अर्जासाठी अडथळ्यांची शर्यत

0
शेतकर्‍यांचा सरकारवर भरोसा राहिला नाय!
देवळाली प्रवरा (वार्ताहर) – राज्यसरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी सेतूमधून अर्ज भरून देण्यात अनंत अडचणी येत आहेत. कर्जमाफी फॉर्म भरून देण्याची ही अडथळ्यांची शर्यत कशी पार करायची? अशी चिंता शेतकर्‍यांना लागली आहे. किचकट फॉर्ममुळे शासनाची कर्जमाफी मृगजळ ठरली असून ‘शेतकर्‍यांचा सरकारवर भरोसा राहिला नाय’ अशी अवस्था झाली आहे.
मोठा गाजावाजा करून फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली खरी! पण ही कर्जमाफी मिळण्यासाठी लाभार्थी कर्जदार शेतकर्‍याांना सरकार दरबारी ऑनलाईन एक अर्ज भरून देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रारंभी हे अर्ज उपलब्ध नव्हते. त्यासाठी शेतकर्‍यांनी सेतूचे उंबरठे झिजविले. आता अर्ज आले. मात्र, त्यावरील माहिती पाहून शेतकर्‍यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. या अर्जासाठी बँक खाते उतारा, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स पाहिजे. हे सर्व आणल्यानंतर त्या शेतकर्‍यांच्या बोटाचा किंवा हाताच्या अंगठ्याचा ठसा घेतला जातो. परंतु बारा महिने शेतात ढोरमेहनत करणार्‍या शेतकर्‍यांच्या हाताचे ठसे यावर उमटतच नाहीत. उमटले तर बर्‍याचदा ‘सर्व्हर डाऊन’ असते. त्यामुळे ही माहिती पुढे जाऊ शकत नाही. यावर कळस म्हणजे हे खाते दोघा पती-पत्नीच्या नावे असावे लागते. अर्जासोबत पत्नीचा जर ठसा नसेल तर अर्ज पुढे जात नाही किंवा संगणक तो अर्ज स्वीकारीत नाही.
अनेक शेतकरी वयोवृद्ध झाले आहेत. त्यांच्या नावावर जमीन आहे, परंतु पत्नी हयात नाही. काहींचे लग्न झाले आहे, मात्र, काडीमोड झाला आहे. काहींची पत्नी नांदत नसल्याने ती माहेरीच असते. तर काही तरूणांच्या नावावर शेती आहे, परंतु लग्न झालेले नाही. अशा लाभार्थी शेतकर्‍यांनी पत्नी आणायची कोठून? असा यक्षप्रश्‍न ग्रामीण भागातील शेतकर्‍यांसमोर आ वासून उभा आहे. ज्यांना पंचवीस हजाराचे अनुदान मिळणार आहे, त्यांना व ज्यांना दीड लाखाची कर्ज सवलत मिळणार आहे, त्यांनाही अट सारखीच असल्याने कर्जमाफीचा अर्ज भरताना ‘भीक नको, पण कुत्रे आवर’, अशी वाईट अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे.

जे शेतकरी वेळेत कर्जफेड करतात, अशांना फक्त पंचवीस हजाराचे अनुदान देऊन सरकारने त्यांची थट्टाच केली आहे. यापूर्वीही असाच प्रकार झाला आहे. त्यामुळे वेळेत कर्जफेड करणारा शेतकरी वेड्यात निघाला आहे. त्यालाही दीड लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी काही शेतकर्‍यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

*