कर्जमाफी : अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांना 53 कोटींचा फटका

0

सोसायट्यांना लाखोंचा भुर्दंड

वीरगाव (वार्ताहर) – महाराष्ट्र सरकारची कर्जमाफीची घोषणा आणि शेतकर्‍यांची निकष न लावता सरसकट कर्जमाफीची मागणी या वादात अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांचे तब्बल 53 कोटींचे नुकसान झाले. 30 जून अखेर सेवा सहकारी संस्थांनी वसूल केलेल्या कर्जरकमेचा भरणाही जिल्हा सहकारी बँकेने व्याजापोटीच वसूल केल्याने संस्थांचेही कंबरडे मोडले असून आधीच तोट्यात असणार्‍या सहकारी संस्थांची आर्थिक पत्रके सभासदांसमोर जाताना आर्थिक अरिष्टाची ठरतील.

अकोले तालुक्यात आदिवासी आणि इतर मिळून 86 सेवा सहकारी संस्था कार्यरत आहेत. या संस्थांनी एकूण 22 हजार सभासदांना दीर्घमुदत, मध्यम मुदत आणि पीककर्ज मिळून मोठ्या रकमेचे वाटप केले. यातील केवळ 779 सभासद थकबाकीत असून उर्वरीत सर्वच शेतकरी नियमीत आणि विहीत मुदतीत कर्जभरणा करतात. 30 जून 2017 ची कर्जाची वसुलास पात्र रक्कम 134 कोटी 5 लाख असून सरकारच्या कर्जमाफी घोषणेमुळे ही रक्कम जमा होण्यास टाळाटाळ झाली. नियमीत कर्जदारांनी वेळेत रक्कम भरली असती तर रुपये 25 हजार सवलतीप्रमाणे साधारण 45 कोटींच्या आसपास सवलत रक्कम मिळाली असती.

परंतु, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी हवी असल्याने शासनाने दिलेल्या 31 जुलै अखेरही कर्ज वसूल झाले नाही. शिवाय कर्जमाफी वेळेत झाली असती तर केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारी 6 टक्के व्याजसवलतही मिळाली असती. ही एकूण सवलत 8 कोटींपेक्षा अधिक रकमेची आहे. नियमीत कर्जपरतफेड करणारांपेक्षा थकबाकीदारांनाच कर्जमाफीत झुकते माप दिसत असल्याने कर्ज रक्कम न भरण्याचाच निर्णय अनेकांनी घेतला.

सरसकट कर्जमाफीची अपेक्षा असल्याने आता थकबाकीत वाढ झाली. परिणामी शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत कर्ज न भरल्याने रकमेची सवलत नाही आणि व्याजसवलत नाही, उलट वेळ टळून गेल्याने कर्ज रकमेला 11 टक्के पर्यंत व्याजाची आकारणी होणार असल्याने शासनाची कर्जमाफीची घोषणा म्हणजे नाथा घरची उलटी खूणच ठरली.

एकट्या अकोले तालुक्याची ही आकडेवारी लक्षात घेता संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा फटका शेतकर्‍यांना बसण्याची शक्यता आहे. आता,कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा शासकीय फतवा असल्याने पदरात काही पडो अथवा न पडो परंतु सरसकट कर्जमाफी होईल या आशेने अर्जांसाठी गर्दी वाढली आहे.

कर्जमाफीचे मुसळ अजून केरातच असून शेतकर्‍यांच्या न्यायासाठी मात्र रांगा लागल्या आहेत. अर्ज भरल्यानंतर मात्र सरसकट कर्जमाफीची मागणी जोर धरेल आणि पुन्हा तीव्र आंदोलन गावाशिवारातून उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सेवा संस्थांवर आर्थिक अन्याय – सेवा सहकारी संस्थांनी शेतकर्‍यांना कर्जवाटप केले.या संस्थांचे सारे स्वामित्व हक्क जिल्हा सहकारी बँकेकडे आहेत. 30 जून अखेर ज्या शेतकर्‍यांनी कर्जभरणा केला त्यांचा भरणा सेवा सहकारी संस्थांनी मुद्दलमध्ये घेतला. बँकेने मात्र सेवा संस्थांचा सर्व भरणा त्यांच्याकडे येणे असलेल्या कर्जरकमेच्या व्याजात घेतला. म्हणजे,सभासदांकडून कर्जरक्कम वसूल झाली आणि बँकेने सेवा संस्थांकडून प्रथम व्याज काढण्याचे धोरण ठेवले. यावर्षी थकबाकी वाढल्याने सभासदांकडून व्याज न येता संस्थांना मात्र रोख व्याज भरण्याचा भुर्दंड पडला. यामुळे उत्पन्न शून्य मात्र खर्चाची वाढती बाजू यामुळे सेवा सहकारी संस्थांचे ताळेबंद मोठ्या तोट्याचे ठरतील.

कर्जवसुलीमध्ये अकोले तालुका प्रथम क्रमांकावरच असतो. परंतु यापुर्वी शेतीमालाच्या पडलेल्या बाजारभावामुळे शेतकर्‍यांकडून कर्जभरणा झाला नाही. शिवाय शासनाच्या कर्जमाफी घोषणेमुळे सरसकट कर्ज माफ होईल या अपेक्षेपोटीच शेतकर्‍यांना करोडो रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.

LEAVE A REPLY

*