Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नवरात्रीचा उपवास आहे? नाशिकमधील उपवासाच्या ‘या’ पदार्थांची चव एकदा घ्याच

Share

नाशिक | प्राजक्ता नागपुरे 

शारदीय नवरात्रोत्सवात नऊ दिवस केल्या जाणाऱ्या उपवासासाठी पदार्थांची आवक आणि विक्री वाढली आहे. बाजारात विविध प्रकारातील उपवासाचे पदार्थ दाखल झाले असून आवक वाढल्याने गतवर्षीच्या तुलनेत दर स्थिर आहेत. यंदा बाजारात उपवासाच्या तयार पदार्थांना ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे.

शहरात साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, उपवास कचोरी, उपवास थालिपीठ, भगर, वरई पुऱ्या, राजगिरा लाडू, सुकमेव्याचे पदार्थ विकले जातात. अशा उपहारगृहांमध्ये ग्राहकांची गर्दी होतांना दिसत. तसेच सुक्यामेव्याच्या खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे दर स्थिर आहेत. खारीक दरात किरकोळ वाढ झाली आहे.

नवरात्री निमित्त अनेक घरांमध्ये महिलांचा उपवास असतो. या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ घरी बनविण्यापेक्षा अनेक नोकरदार, विद्यार्थी तसेच चवीत बदल करण्याच्या हेतूने गृहिणीदेखील शहरातील काही लोकप्रिय ठिकाणांना पसंती देतात. साबुदाण्याच्या खिचडीपासून सुरू होणाऱ्या या उपवासस्पेशल खाद्यपदार्थांनी यंदा उपासकर्त्यांना भुरळ घातली आहे.

साबुदाणा वडा

उपवासाच्या काळातील लाडका पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. हा साबुदाणा वडा खायचा असल्यास नाशिकमधील ‘सायंतारा’ उपहारगृहाशिवाय पर्याय नाही. शहराच्या भद्रकाली परिसरामध्ये असलेल्या या दुकान वजा हॉटेलमध्ये उपवासाचे अनेक पदार्थ मिळत असले तरी इथली खासियत आहे ती साबुदाणा वडा.

नवरात्राच्या उपवासानिमित्त तळहाताच्या आकाराइतका खुसखुशीत साबुदाणा वडा खाण्यासाठी नाशिककर सायंतारामध्ये रांगा लावतांना दिसतात. या वड्यांमध्ये वापरलेले शेंगदाणे अर्धवट कुटलेले असतात.

शेंगदाण्याचे कुट आणि भगरीपासून बनविलेली इथली हटके चटणी गरमागरम साबुदाणा वड्यावर ओतून दिली जाते. इथे मिळणारी बटाट्यामध्ये खोबरं, शेंगदाण्याचे सारण असलेली कचोरी हा प्रकारही नाशिककरांच्या आवडीचा आहे.

बटाटा जिलेबी

अनेकांना गोड खाल्ल्याशिवाय राहवत नाही. उपवासकाळात गोडाची हौस भागविण्यासाठी बटाटा जिलेबीचा पर्याय शोधला जातो. त्यामुळे खवय्या नाशिककरांनी उपासाच्या जिलेबीलाही मोठी पसंती दिली आहे. नवरात्रात नाशिकमधील प्रसिद्ध बुधा हलवाई तसेच कॉलेजरोडवरील सागर स्वीट याठिकाणी बटाटा जिलेबी खाण्यासाठी गर्दी होतांना दिसते.

बटाटा, दही आणि आरारुट मिसळून हे जिलेबीचे पीठ बनविले जाते. हे पीठ रात्रभर भिजल्यानं‌तर साजूक तुपामध्ये जिलेबी तळून घेतली जाते. त्यानंतर ही जिलेबी साखरेच्या पाकामध्ये टाकली जाते. गोडाची आवड असणाऱ्यांसाठी ही बटाटा जिलेबी जणू वरदान आहे.

उपवासाचे थालिपीठ

नवरात्रातील काळात तेच तेच उपवासपदार्थ खाऊन उबग आलेल्यांसाठी उपवासाच्या थालिपीठाचा पर्याय योग्य आहे.
त्यामुळेच उपवासाच्या थालिपीठाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

गंगापूर रोडवरील मॉडर्न कॅफे उपवास थालिपीठासाठी प्रसिध्द आहे. या हॉटेलात भगर, साबुदाणा आणि राजगिरा यामध्ये थोडे जीरे टाकून हे सर्व एकत्र करुन त्याचे पीठ दळून आणले जाते. हिरवी मिरची, कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट मिसळून हे पीठ थोडे सैलसर मळले जाते व तव्याला तुप लावून त्यावर हे थालिपीठ भाजले जाते. सोबतचे मलाईदार दही, ओल्या नारळाची चटणी थालिपीठाची चव आणखीनच वाढविते. उपवासाच्या दिवशी पोटभरीचा पदार्थ म्हणून या उपवास थालिपीठाला नवरात्रकाळात अधिक मागणी आहे.

या पदार्थांशिवाय बटाट्याचे, केळ्याचे वेफर्स, बटाट्याचा गोड व तिखट चिवडा, साबुदाण्याचा चिवडा, साबुदाणा व बटाट्याचा मिक्स चिवडा, बटाटा साबुदाण्याची पापडी, फणसाचे तळलेले गरे, राजगिरा लाडू यांसारख्या उपवासाच्या पदार्थांना अधिक मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!