बनावट बातम्यांना ‘फेसबुक’ रोखणार

0
सोशलवर वाढत्या अफवांमुळे प्रतिबंधात्मक पाऊले
नवी दिल्ली : फेसबुकच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे हिंसात्मक घटना घडू लागल्या आहेत. या पार्श्‍वभुमीवर फेसबुकने आता चुकीच्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती हटवण्याचे ठरवले आहे. भारतासह अनेक देशांमध्ये अशा या अफवांचे लोण पोहोचल्याने ही खबरदारी घेण्यात येणार आहे. सद्यस्थितीत थेट हिंसेची चिथावणी देणाऱ्या पोस्टना फेसबुकडून रोखले जाणार आहे. नवीन धोरणानुसार हिंसा भडकण्याचे शक्‍यता निर्माण करणाऱ्या “फेक न्यूज’ किंवा छेडछाड केलेल्या “इमेज’बाबतही सतर्कता बाळगण्यात येणार आहे.

भारतात काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारामागे फेसबुकवरील पोस्ट कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले होते. चुकीची माहिती पसरवल्याबद्दल या सोशल नेटवर्किंग साईटवर जोरदार टीकाही झाली होती. आक्षेपार्ह मजकूरावर फेसबुक कारवाई करत नसल्याच्या टीकेमुळे फेसबुकचे मुख्य कार्यकारी मार्क झुकेरबर्ग यांनीही याबाबत स्पष्टिकरण दिले होते.

‘व्हॅट्स ऍप’ देखील कारणीभूत..
भारतामध्ये फेसबुकची मालकी असलेल्या “व्हॉट्‌स ऍप’कडून सर्वाधिक प्रमाणात बेजबाबदार मेसेज आणि चिथावणीखोर अफवा व्हायरल होत असतात. अशाच प्रकारांमधून जमावाकडून मारहाण आणि हत्येच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. म्हणूनच फेसबुकने आपल्या धोरणात बदल करण्याचे ठरवले आहे. पुढील महिन्यापासूनच या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

*