Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीगोंदा शहरात पुन्हा बनावट नोटांचे रॅकेट

Share

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – दोन महिन्यांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यापासून सुरू झालेल्या बनावट नोटांचे रॅकेट शेजारच्या जिल्ह्यपर्यंत पोहचल्याचे उघड झाले होते .आताही श्रीगोंदा शहरात 2 हजार, 500 व 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून वितरित करणार्‍या टोळीच्या म्होरक्यांला मुद्देमालासहित रंगेहाथ पकडले असून यात विजय दादासाहेब वाळुंज व अक्षय गोळे या दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी पोलीस हवालदार दादासाहेब टाके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून अटक केले आहे. या बनावट नोटांची लिंक कुठपर्यंत पोहचली आहे हे तपासात निष्पन्न होणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा शहरात श्रीगोंदा- दौंड रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या बसस्थानकासमोर सकाळी 11 च्या सुमारास दोन संशयित तरुण थांबले असून त्यांच्याकडे 2 हजार, 500 व 100 रुपयांच्या बनावट नोटा असल्याची गुप्त खबर्‍याकडून माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी सापळा रचून आरोपी हस्तगत केले.

या कारवाईत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांनी फौज फाट्यासह सापळा रचून तेथे उभ्या असलेल्या विजय दादासाहेब वाळुंज रा. टाकळी कडेवळीत व अक्षय गोळे रा.काष्टी यांना ताब्यात घेऊन यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या 2 नोटा, 500 रुपयांच्या 13 व 100 रुपयांच्या 8 अशा सुमारे 11 हजार 300 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने त्यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसांत भारतीय चलनाच्या नोटा बनावट नोटा बनवून जवळ ठेवणे व वितरित करणे यानुसार भा. दं. वी.489 अ.ब.क.ड. नुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन्ही आरोपींस अटक करण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या नेतृत्वाखाली व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत, किरण भापकर करत आहेत.

बनावट नोटांचे विस्तारले जाळे, तरुण जाळ्यात
दोन महिन्यांपूर्वी श्रीगोंदा पोलिसांनी बनावट नोटांचे रॅकेट शोधले होते. यात देखील अनेक जण आर्थिक मोहापायी या रॅकेटचा भाग बनले असताना आताही हे दोन तरुण पकडले असून यात अजून कोण कोण सामील आहे याची लिंक लागणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!