डीडीआरकडून मानीव हस्तांतरणाची सोय

0

नाशिक । बिल्डरच्या आडमुठेपणामुळे नोंदणीकृत असलेल्या नाशिकमधील 3 हजार 246 गृहनिर्माण सोसायट्यांचे डीम कनव्हेन्स होणे अद्यापही बाकी आहे.

त्यामुळे सोसायटीचे आणि ग्राहकांचे सात-बारा उतार्‍यावर नावच येत नसून बिल्डरचेच नाव त्यावर असल्याने भविष्यात घर विक्रीसाठीही अडचण होते. ही अडचण टाळण्यासाठी ग्राहकांंनी त्वरित जिल्हा उपनिबंधकांशी संपर्क साधावा. बिल्डरकडून अडवणूक होत असल्यास डीडीआरच स्वत: त्यांच्या अधिकारात डीम कनव्हेन्स करून देतील. तसे आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

बिल्डरकडून ग्राहकांना घरे विक्री केली जातात. त्यात प्रथम केवळ सेलडीड केले जाते. पण लोभापायी अनेकदा डीम कनव्हेन्स करण्यासाठी अडवणूक केली जाते.

त्यामुळे शासनाने 2012 साली बिल्डरकडून अडवणूक होत असल्यास बिल्डरच्या वतीने डीम कनव्हेन्सचे मानीव हस्तांतरणचे अधिकारी डीडीआरला दिले आहेत. त्यासाठी सोसायटीतील एकूण फ्लॅट धारकांपैकी 60 टक्के ग्राहकांची संमती असल्यास आणि इमारत पूर्णत्वाचा दाखला असल्यास डीडीआरलाही डीम कनव्हेन्स करून देता येते.

परंतु आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील 4 हजार 990 गृहनिर्माण सोसायट्यांपैकी अवघ्या 1744 सोसायट्यांचेच डीम कनव्हेन्स झाले आहे. उर्वरित 3 हजार 246 सोसायट्यांचे अद्यापही झालेले नाही.

पैसे देऊही केवळ सेलडीडच मिळते. फार कल्पना नसल्यामुळे ग्राहकही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आजही नाशिकमध्ये 3 हजार 246 सोसायट्या डीम कनव्हेन्सशिवाय आहेत. त्यामुळे घरे खरेदी-विक्रीसाठी ग्राहकांना मोठ्या अडचणी येत आहेत.

अशी तक्रार ग्राहक तक्रार निवारण समितीच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी तत्काळ जिल्हा उपनिबंधकांना सूचना दिल्या. शिवाय अशा अडचणीतील सोसायट्यांनी, तेथील रहिवाशांनी त्वरित डीडीआरशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

त्याचबरोबर जिल्हा उपनिबंधकांकडे गृहनिर्माण सोसायटी म्हणून नोंदणी झालेल्या परंतु अद्यापही डीम कनव्हेन्स झाले नसलेल्या सोसायट्यांना नोटिसा देत ते नोंदवण्याचे आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले. त्यामुळे आता कागदोपत्री तांत्रिक बाबी पूर्ण असलेल्या परंतु केवळ बिल्डरच्या हेक्यापायी अडकून पडलेल्या सोसायट्यांचा डीम कनव्हेन्स अडचण दूर होण्यास गती मिळण्याची शक्यता आहे. बैठकीस सुधीर काटकर, हरिश मारू, प्रकाश वैशंपायन,सुरेशचंद्र राहटकर, दीपक पाटोदकर, लक्ष्मण गव्हाणे, शिवाजी मोंढे, डॉ. प्रतिभा औंधकर यांच्यासह शासकीय अधिकारी आणि समितीचे सदस्यही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*