Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रदापोली कृषी विद्यापीठात अव्होकाडोचा प्रयोग : कृषीमंत्री दादाजी भुसे

दापोली कृषी विद्यापीठात अव्होकाडोचा प्रयोग : कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

राज्यात अव्होकाडो (लोणी फळ) फळाच्या लागवडीला चालना देण्यात येत असून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात या संदर्भात प्रायोगिक तत्त्वावर लागवडीचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी दिली.

- Advertisement -

जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रात जे संशोधन आहे त्याचाच भाग म्हणून या लागवडीकडे पाहिले जात आहे. कोकणात या फळाची लागवड यशस्वी झाल्यास मोठी क्रांती ठरेल, असेही भुसे यांनी सांगितले.

मंत्रालयात या संदर्भात आज बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत आदी यावेळी उपस्थित होते. न्युट्रीफार्म ॲग्रीकल्चर कंपनीमार्फत या संदर्भात सादरीकरण करण्यात आले.

अव्होकाडो हे मुळचे अमेरिकेचे फळ असून त्याला बाजारात मोठी मागणी आहे. भारतीय ग्राहकांमध्ये अद्याप त्याचा प्रसार कमी असून आरोग्याच्या दृष्टीने या फळाचा आहारात समावेश केल्यास फायदा होतो. या फळात ऊर्जा मोठ्या प्रमाणात असून रक्तातील साखर वाढू न देता ऊर्जा देण्याचे काम केले जाते.

त्याचबरोबर या फळात प्रथिने जास्त आणि कर्बोदके कमी असतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे फळ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अव्होकाडो फळाच्या लागवडीस चालना देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सध्या भारतात या फळाची उलाढाल ५० कोटी रुपयांच्या आसपास असून सुधारित जातीच्या लागवडीची निर्यात केल्यास अधिक उत्‍पन्न मिळू शकते, असे सादरीकरण दरम्यान सांगण्यात आले.

मालूमा, हास, पिंकर्टन या जातीच्या फळाला जगभर मागणी आहे. कोकण कृषी विद्यापीठामध्ये मालूमा, हास या जातींची लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात यावर्षी आठ ते दहा शेतकऱ्यांकडे या फळाची लागवड प्रस्तावित असून जांभळा आणि पिवळसर राखाडी रंगाच्या स्थानिक जाती आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या