Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

समृद्धीसाठी नाले, तलावांतून साडेचार लाख  घनमीटर खोदकाम 

Share

सिन्नर व इगतपुरी तालुक्यांत जलसमृद्धी; ४५ कोटी  लिटर अतिरिक्त पाणीसाठा

नाशिक । अजित देसाई 

राज्यातील पायउतार झालेल्या फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई ते नागपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अर्थात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यातील धरणे, पाझर तलाव, प्रमुख नाले व नद्यांमध्ये पावसाळ्यापूर्वी सुमारे साडेचार लाख  घनमीटर खोदकाम करण्यात आले आहे.

रस्त्यासाठी माती व मुरूम उपलब्ध करून घेताना हे खोदकाम करण्यात आल्याने या दोन्ही तालुक्यांत ४५ कोटी लिटर इतका अतिरिक्त पाणीसाठी वाढला आहे. यापैकी जवळपास ७० टक्के खोदकाम एकट्या सिन्नर तालुक्यात झाले असून समृद्धीने या भागात खऱ्या अर्थाने जलसमृद्धी आणल्याचे चित्र आहे.

वर्षभरापूर्वी थेट खरेदी पद्धतीने भुसंपादन प्रक्रिया आटोपल्यावर समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आली. या रस्त्याची आखणी जमिनीला समांतर त ठेवता ठराविक उंचीवर करण्यात आली असल्याने त्यासाठी आवश्यक भरावासाठी महामार्ग जाणाऱ्या परिसरातील धरणे, पाझर तलाव, नाले, ओढे यामधील गाळ आणि मुरुमाचे खोदकाम करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

नाशिक मध्ये २ टप्प्यांत महामार्ग उभारणीचे काम सुरु असून एका टप्प्यासाठी दिलीप बिल्डकॉन पाथरे ते सोनारी दरम्यान तर सोनारी पासून पुढे इगतपुरी तालुक्यातील दुसऱ्या टप्प्याचे काम जीएससीपीएल या कंपन्यांनी घेतले आहे. सरकारच्या धोरणानुसार महामार्ग उभारणीवेळी आवश्यक असणारा माती व मुरुमांचा भराव परिसरातील नद्या व बंधाऱ्यामंध्ये खोदकाम करून केला जाणार असल्याने साहजिकच वर्षानुवर्षे पाण्याबरोबर वाहून आलेली माती उपसण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले होते.

समृद्धीसाठी खोलीकरण करताना मर्यादा नसल्याने तळाला खडक लागेपर्यंत सुमारे २५ ते ३० फुटांपर्यंत खोदकाम करण्यात आले. यामुळे खोली वाढून बंधाऱ्यांसह नाले व नदीच्या पात्रातील पाणी साठवण क्षमता कमालीची वाढली. या कामाचा मुख्य फायदा दुष्काळी म्हणून मिरवणाऱ्या सिन्नरमधील पूर्वेकडील भागात अधिक प्रमाणात झाला आहे.

पावसाळ्यापूर्वी सिन्नर तालुक्यात जवळपास ३ लाख ३५ हजार घनफूट माती व मुरुमांचा उपसा झाल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यत सकारात्मक चित्र बघायला मिळते आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ  स्वप्नवत वाटणारे खोलीकरण झाल्याने व उशिरापर्यंत पावसाने कृपादृष्टी केल्याने आज सिन्नरमधील सर्वच ठिकाणी अपेक्षेपेक्षा अधिक जलसाठा निर्माण झाला आहे. केवळ सिन्नरपुरता विचार केल्यास सुमारे साडे तेहतीस कोटी लिटर पाणी आजघडीला अतिरिक्त साठ्याच्या रूपात उपलब्ध झाले असून या जलसमृद्धीतून पुढची काही वर्षे शेतीला चालना मिळणार अणे. इगतपुरीत देखील याच माध्यमातून एक लाख १४ हजार घनमीटर खोदकामामुळे साडेअकरा कोटी लिटर पाणीसाठा वाढला आहे.

शासनाच्या जलयुक्त शिवार मोहिमेवर मागील पाच वर्षात या दोन्ही तालुक्यात कोट्यवधींचा खर्च होऊनही जे साधले नाही ते केवळ वर्षभरात समृद्धीच्या कामामुळे व एक रुपया शासनाचा खर्च न करता साकारले आहे. एका अर्थाने समृद्धी महामार्गासाठी करण्यात आलेल्या नदी , नाले, धरणे व तलावांतील खोदकामामुळे जलसमृद्धी आली असून पुरेशा क्षमतेने हे खोदकाम पुढे नेल्यास जलस्तर उंचावण्यात देखील हातभार लाभणार आहे. यंदाच्या पावसाने या भागात पाणीसाठा वाढला असल्याने एरवी खरीपावरच वार्षिक अर्थकारण जुळणारे शेतकरी पुढच्या तीन वर्षांसाठी बारमाही पिकांच्या नियोजनात व्यस्त आहेत.


या तलावांची वाढली खोली 

सिन्नर तालुक्यात  कोनांबे ( २८०० घनमीटर), फुलेनगर व दातली ( प्रत्येकी एक लाख १४ हजार घनमीटर), भोजापूर  (१५०० घनमीटर), गुरेवाडी (५७०० घनमीटर), डुबेरेवाडी ( ४३५०० घनमीटर), दापूर ( १४२५० घनमीटर), सुरेगाव (३५०० घनमीटर), मिरगाव (१५०० घनमीटर), बोरखिंड ( २५९१२ घनमीटर), आगासखिंड (२०६५७ घनमीटर), इगतपुरी तालुक्यात दारणा धरण (४५००० घनमीटर) व शेनवड (२३००० घनमीटर) या धरण, मध्यमप्रकल्प व पाझरतलाव असणाऱ्या क्षेत्रातून केलेल्या खोदकामामुळे तेथे अतिरिक्त पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. तर पांगरी, पाथरे, कोळगाव माळ, बहादरपूर, सायाळे, वारेगाव, मिरगाव, दुसंगवाडी, मिठसागरे, फुलेनगर, मऱ्हाळ, सुरेगाव, मानोरी, भोकणी, खोपडी, दातली, सोनांबे या सिन्नरमधील गावांच्या परिसरात समृद्धीसाठी खोलीकरण झाले आहे.


कोकाटेंच्या मागणीचा आश्वासक फायदा 

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी गेल्या वर्षी शासनाकडे समृद्धी मार्ग जाणाऱ्या भागातील धरणे, तलाव व नदी, नाल्यांचे खोलीकरण करून तेथून निघणारे गौणखनिज रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात यावे अशी मागणी केली होती. या खोदकामासाठी ठेकेदाराला रॉयलटी माफ करण्यात यावी असेही कोकाटे यांनी म्हटले होते. समृद्धीसाठी लागणारे गौणखनिज कोकाटे यांनी सुचवल्याप्रमाणे उपलब्ध करून घेतले तर प्रकल्प खर्चात काहीशी घट होईल आणि धरणांमधील गाळ काढल्याने त्यांची साठवण क्षमता देखील वाढण्यात मदत होईल.

हा दुहेरी फायदा लक्षात घेऊन शासनाने महामार्ग जाणाऱ्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे गौणखनिज उपलब्ध करून घेण्याचे निर्देश दिले होते. दूरदृष्टी ठेवून कोकाटे यांनी केलेल्या मागणीचा दृश्य परिणाम केवळ सिन्नरच नव्हे तर राज्याच्या इतरही भागात बघायला मिळतो आहे. एक प्रकारे शेतकऱ्यांना याचा आश्वासक फायदा झाला आहे.

यापुढील काळात जिल्हातील दारणा, कडवा, भोजापूर या मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातून येथे वर्षानुवर्षे साठलेली माती काढण्याचे नियोजन व्हायला हवे. अनेक ठिकाणी खोदकाम झालेल्या तलावांच्या परिसरात अडचणींमुळे खोदकाम झाले नाही. त्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!