Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

शिवबंधन जीर्ण होण्याआधीच महाले स्वगृही परतले; शिवसेना सोडल्यानंतर महालेंनी केले होते शिवबंधनावर मोठे वक्तव्य

Share

दिंडोरी  | प्रतिनिधी 

दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेद्वार व माजी आमदार धनराज महाले स्वगृही परतले आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी सेनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या आधी सेनेतून महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेचे तिकीट मिळवले होते. मात्र त्यांचा भाजपच्या डॉ भारती पवार यांनी पराभव  केला होता.

दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाले यांना एका पत्रकाराने हातातले शिवबंधन कधी काढणार याबाबत प्रश्न विचारला होता. त्याच वेळी महाले यांनी शिवबंधन जीर्ण झाल्यावरच सुटेल असे म्हटले होते. या घटनेच्या थोड्याच दिवसांनी महालेंनी शिवबंधन जीर्ण होण्याआधीच घरवापसी केल्यामुळे  दिंडोरी -पेठ विधानसभा मतदार संघातील सर्वच  राजकीय गणिते बदलणार असून त्यामुळे राजकीय घडामोंडीनी वेग घेतला आहे.

दिंडोरी-पेठ विधानसभा संघात आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्‍वभुमीवर डावपेचांना  वेग आला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात स्पर्धा वाढलेली असताना युती आघाडीची चर्चा  जोमाने घडत आहे. विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्याबद्दलही शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा झडत असतांना आ.झिरवाळ यांनी शिवसेनेत जाणार नसल्याचे खुलासा केला आहे.

त्यानंतर  माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दलही चर्चा झडत होती.परंतु सर्व चर्चा ंहोत असताना धनराज महाले यांनी कोणताही  सुगावा लागू न देता आज शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

उध्दव ठाकरे यांनी धनराज महाले यांना शिवबंधन बांधले. माजी खासदार कै.कचरु राऊत यांचे चिरंजीव दिलीप राऊत यांनीही शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांनाही शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खा.संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, सहकार नेते सुरेश डोखळे, तालुकाप्रमुख सतिश देशमुख, पेठ तालुकाप्रमुख भास्कर गावित, युवा सेना तालुकाप्रमुख किरण कावळे,माजी जि.प.गटनेते प्रविण जाधव, पप्पु मोरे, संपत घडवजे, बाळासाहेब मुरकूटे, सुभाष मेधणे,वैभव महाले, संतोष मुरकूटे, लक्ष्मण देशमुख,  निवृत्ती क्षिरसागर, सुदर्शन जाधव, नदीम सैय्यद,आबा जाधव, डॉ.विलास देशमुख आदींनी धनराज महाले यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले. यावेळी खा.संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनीही सर्व शिवसैनिकांना आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सज्ज राहण्याच्या सुचना केल्या. धनराज महाले यांनीही पक्षाचे काम जोमाने करण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान धनराज महाले यांच्या शिवसेना प्रवेशामुळे दिंडोरी तालुक्यात राजकीय घडामोंडीना वेग आला असून त्याचा परिणाम तालुक्यातील राजकारणावर होणार आहे. सध्या राष्ट्रवादीकडून आ.नरहरी झिरवाळ यांचे नाव चर्चेत आहे.

भाजप आणि सेना युती नाही झाली तर भाजपचा उमेद्वार कोण राहील? याबाबत चर्चा झडत आहे. माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनाही दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघात उभे राहण्याची गळ भाजपच्या नेत्यांनी घातली आहे. तथापि हरिश्‍चंद्र चव्हाण नेमकी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. तालुक्यातील पदाधिकारी, दिंडोरी नगरपंचायतीचे स्थानिक भाजपचे नगरसेवक  याबाबत आगामी व्युहरचना करीत आहे.

भाजपकडून युती न झाल्यास नवीन कोरी पाटी देण्याचीही शक्यता  वर्तवण्यात येत आहे. रामदास चारोस्कर यांचीही अद्याप पक्षाबाबत भुमिका स्पष्ट नसल्याने ते कोणत्या पक्षाकडून उमेद्वारी करतात की अपक्ष उभे राहतात याकडे लक्ष लागले आहे.  भास्कर गावित, सदाशिव गावित यांनी विधानसभा मतदार संघात प्रचार दौरे केलेले आहे.

आगामी निवडणूकीत दिंडोरी नगरपंचायत, पेठ नगरपंचायत, दिंडोरी,पेठ पंचायत समिती, बाजार समिती, कादवा कारखाना,  स्थानिक स्वराज्य संस्था आदींचे सदस्यांच्या भुमिका महत्वपूर्ण असल्याने सर्व कामाला लागलेले आहे. राज्यातील व केंद्रातील परिस्थितीचा व स्थानिक राजकारणाचा फायदा कोण कसा घेतो यावरच राजकीय गणिते अवलंबुन आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!