Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

कामगार नेते, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी

भारताचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज सकाळी दिल्लीत निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

कामगारांचे नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जॉर्ज नगरसेवक ते देशाचे संरक्षण मंत्री असा प्रवास केलेले नेते होते. अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या आजाराने ते दीर्घकाळापासून अंथरुणात होते.

फर्नांडिस 1967 मध्ये तत्कालीन दक्षिण बॉम्बेमधून काँग्रेसच्या एस.के. पाटील यांना पराभूत करून ते पहिल्यांदा खासदार बनले होते. 1975 च्या आणीबाणीनंतर फर्नांडिस बिहारच्या मुजफ्फरपूरमधून खासदार बनले होते.

मोरारजी देसाई सरकारमध्ये ते उद्योग मंत्री होते. त्याशिवाय त्यांनी व्हीपी सिंह सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री पदावरही होते. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार (1998-2004) मध्ये फर्नांडीस संरक्षण मंत्री होते. कारगिर युद्धाच्या काळातही ते संरक्षणमंत्री होते.

फर्नांडिस यांच्या निधनाने एका वादळी पर्वाचा अस्त – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

देशातील कामगार चळवळीचे प्रणेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनाने एका वादळी पर्वाचा अस्त झाला असून आपण स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्वाचे राजकीय व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जॉर्ज फर्नांडीस भारतीय राजकारणातील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. देशातील कामगार चळवळीला त्यांनी संघर्षाचा एक धगधगता आयाम दिला. त्यात त्यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तरच्या दशकात झालेला रेल्वे कर्मचाऱ्यांचा अभूतपूर्व संप एक महत्त्वाचा अध्याय आहे.

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक राजधानीतील संघटित कामगार हे त्यांच्या लढाऊ संघटन कौशल्याचे फलित आहे. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी बजावताना त्यांनी अणुचाचण्या घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात विविध महत्त्वाच्या विभागांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. कोकण रेल्वेच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!