लागवड होतेच परंतु वृक्षसंवर्धनाचे आव्हान

0
प्रवीण खरे – महाराष्ट्र शासनाने यंदा ४ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. नाशिक जिल्ह्यात १४ लाख ६३ हजार वृक्षलागवड केली जाणार आहे. त्या दृष्टीने वनविभागाकडून तयारी करण्यात आली आहे. वृक्षलागवडीसाठी पुढाकार शासनासह सर्वच नागरिक घेतात; परंतु वृक्षसंवर्धनाबाबत अद्यापही उदासिनता असल्याने वृक्ष वाचविण्यासाठी चळवळ उभरण्याची गरज आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला शासनाकडून वृक्षलागवड मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येते. त्यानुसार यंदा राज्यभर ४ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय पुढील दोन वर्षासाठी अनुक्रमे १३ कोटी व ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात यंदा १४ लाख ६३ हजार तर २०१८ या वर्षासाठी ३७ लाख ८० हजार आणि २०१९ साठी ८४ लाख ४० हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे. कागदोपत्री नियोजन उत्तम होत असले तरी प्रत्यक्षात वृक्षलागवड कमी होते. जवळपास ६० टक्के वृक्ष जगतात.

वृक्षसंवर्धनाकडे होणारी डोळेझाक, उन्हाळ्याच्या कालावधीत झाडांना न मिळणारे पाणी याशिवाय जंगलतोड, दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वृक्षांचा बळी घेतला जातो. त्यामुळे पर्यावरणाला फटका बसतो. पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते. एकदा का वृक्षलागवड केली की आपले काम संपले या आविर्भावात नागरिक वृक्ष जगविण्याचे काम विसरतात.

त्यामुळे आपण झालेल्या वृक्षाचे पुढे काय झाले याचा विचार काही टक्के लोकच पुढे करतात. त्यामुळे वृक्षलागवड करतांनाच सदर वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेणे महत्वाचे आहे. काही टेकड्या संस्थांना दत्तक देता येतील का किंवा अन्य संस्थांकडून त्यांचे संवर्धन करता येईल का याचाही विचार होणे आवश्यक आहे.

योग्य प्रमाणात खत न मिळाल्याने, पाणी वेेळेवर न मिळाल्याने वृक्ष मृत पावतात. त्यामुळे वृक्ष जगविण्याची टक्केवारी वाढविण्याची खर्‍या अर्थाने गरज आहे. त्यासाठी शासनाला सहकार्य करतानाच, युवक, शाळेतील लहान मुले, महिला वर्ग यांना वृक्षसंवर्धानाचे धडे देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून जास्तीत जास्त वृक्ष वाचवून पर्यावरण रक्षणाला मोठा हातभार लागू शकतो.
वृक्षलागवडीबाबत वनमंत्र्यांनी मागील आठवड्यात महत्वपूर्ण बैठक घेऊन राज्याचे चित्र स्पष्ट केले. वृक्षलागवडीचा आराखडाच त्यांनी मांडला. वृक्षलागवडीची आकडेवारी सुखावह असली तरी लागवड केलेल्या वृक्षांपैकी किती जगले याची ठोस आकडेवारी शासनाकडे नाही.

कारण एकदा वृक्षलागवड झाली की त्याकडे कुणीही ढुंकूनही बघत नाही. त्यामुळे आकडेवारी असण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही. वृक्षसंगोपनासाठी विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता असून, समाजातील प्रत्येक थरातील नागरिकाला या चळवळीत सहभगी करून घेण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून त्यामुळे जिल्हा पर्यायाने राज्य हिरवेगार होऊन पर्यावरण रक्षणाचे कर्तव्यही आनंदाने पार पाडता येईल.

LEAVE A REPLY

*