Type to search

Featured सार्वमत

अभियंते पुन्हा सामूहिक रजेवर जाण्याच्या विचारात

Share

रिक्त पदांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी : आयुक्तांची भेट घेणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेतील अभियंते पुन्हा एकदा सामूहिक रजेच्या पवित्र्यात आहेत. अभियंत्यांची रिक्त पदे न भरण्यात आल्याने असलेल्या अभियंत्यांवर येणारा ताण आता असह्य झाल्याने या मागणीसाठी हे आंदोलन करण्याच्या विचारात आहेत. दोन दिवसात आयुक्तांची भेट घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

महापालिकेमध्ये तांत्रिक पदांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. सध्याच्या आकृतिबंधानुसार महापालिकेला 67 अभियंत्यांची पदे मंजूर आहेत. त्यात विविध विभागांतील मिळून 58 पदे रिक्त आहेत. यामुळे या सर्व पदांच्या कामाची जबाबदारी सध्या कार्यरत असलेल्या अभियंत्यांवरच पडत आहे. शहराचा वाढता व्याप पाहता अभियंते जास्त असण्याची गरज आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतेही ठोस पावले उचलली जात नसल्याने ही पदे रिक्त आहेत.

नव्याने भरती होत नसल्यास किमान शासनाकडून अभियंते मागवावेत, असाही प्रयत्न झाला होता. मात्र महापालिकेच्या कारभाराची ख्याती राज्यभर असल्याने नगरमध्ये येण्यास कोणी धजावत नाही. महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, नगररचना, घनकचरा व व्यवस्थापन, विद्यूत, मोटार व्हेईकल अशा विविध विभागात अभियंत्यांची गरज असतानाही तेथे अभियंते नाहीत. दोन आठवड्यापूर्वी महापालिकेत शहर अभियंत्यांवर बूट फेकण्यात आला होता. त्यावेळीही हा विषय चर्चेत आला. अभियंत्यांनी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेऊन अभियंता नियुक्तीसाठी खास परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी आग्रह धरला. त्याचेही पुढे काहीच झाले नाही.

महापालिकेत आयुक्त व उपायुक्त दर्जाचे अधिकारी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येतात. ते दोन ते तीन वर्षे राहतात. त्यांना येथील या अडचणींचा जास्तकाळ सामना करावा लागत नाही. त्यामुळे नवीन अभियंते घेण्याची किंवा शासनाकडून अभियंते मागून घेण्याची प्रक्रिया होत नाही. त्यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा या अधिकार्‍यांकडून होत नसल्याने अभियंत्यांमध्ये नाराजी आहे. जेथे गरज पडेल, तेथील कामाची अतिरिक्त जबाबदारी दुसर्‍या अभियंत्यांवर टाकून अधिकारी रिकामे होतात, हा अनुभव आहे. दोन दिवसांपूर्वी प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के आणि प्रकल्प अभियंता आर. जी. मेहेत्रे यांच्यावर अशीच जबाबदारी टाकण्यात आली. सोनटक्के शहर अभियंता म्हणजे अभियंत्यांचे प्रमुख मानले जातात.

त्यांच्यावर पाणीपुरवठ्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. म्हणजे त्यांना या विभागातील एका कनिष्ठ अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागेल. तसेच मेहेत्रे यांच्याकडे बांधकाम विभागाची जबाबदारी देण्यात आली. यापेक्षा अधिक अभियंत्यांची गरजच नाही, असे प्रशासनातील काही अधिकार्‍यांचे म्हणणे असल्याने अभियंते अस्वस्थ आहेत. त्यामुळेच आता सामूहिक रजेचे आंदोलन हाती घेण्याचा त्यांचा विचार आहे.

वीजबिल आस्थापना खर्चात!
आस्थापना खर्च जास्त असल्याने नवीन नियुक्ती करणे अशक्य असल्याचे आस्थापना विभागाचे म्हणणे आहे. मात्र या अस्थापना खर्चात त्यांनी पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या येणार्‍या बिलाचा खर्चही समाविष्ट केल्याचे अभियंत्यांकडून सांगण्यात आले. अत्यावश्यक खर्च आस्थापना खर्चात समाविष्ट करण्याचा हा पराक्रम नगर महापालिकेतच होऊ शकतो, असेही यावर एका अभियंत्याने कोटी केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!