अभियांत्रिकीचा निकाल लांबणीवर; विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर

आयोगाने तारीख कळवूनही पुणे विद्यापीठ थंडच

0
नाशिक । पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षेचा निकाल जुलैचा दुसरा आठवडा उलटूनही लागलेला नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यात आरटीओ पूर्वपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच होऊ घातलेल्या मुख्य परीक्षेला मुकावे लागण्याची भीती आहे.

येत्या दोन दिवसांत या परीक्षेचा निकाल विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला नाही, तर मुख्य परीक्षेचे फॉर्म या विद्यार्थ्यांना भरता येणार नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. याबाबत पुणे विद्यापीठाच्या संबंधित विभाग आणि कुलगुरू कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

30 एप्रिल 2017 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आरटीओच्या 833 पदांसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. मॅकॅनिकल पदवीधारक आणि पदवीच्या शेवटच्या वर्षात असणार्‍या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यशही संपादन केले. मात्र मुख्य परीक्षेचा फॉर्म भरतांना प्रत्येक विद्यार्थ्याला पदवीचे गुणपत्रक तसेच निकालाची तारीख भरणे आवश्यक असल्याचा आयोगाचा नियम आहे.

विशेषत: पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचा फॉर्म भरतांना गुणपत्रक आणि निकालाची तारीख आवश्यक आहे. पण अद्याप निकाल न लागल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार असून विद्यापीठाने येत्या दोन दिवसांत निकाल लावावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

यावर मार्ग काढण्याच्या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाकडे पंधरा दिवसांपासून तक्रारी केल्या होत्या. परंतु त्यावर विद्यापीठाने कुठलाही निर्णय दिलेला नाही. विद्यापीठाच्या चालढकलीच्या कारभारामुळे या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा हुकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्यांनी आयोगाकडे तारीख लांबवण्यासाठी विनंती केली होती. मात्र, आधीच विद्यापीठाला या परीक्षेसंदर्भात पूर्वसूचना देण्यात आल्याची माहिती आयोगाने दिली आहे. त्यामुळे आयोगाकडून परीक्षेच्या तारखेत बदल होणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*