बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंसिध्दा यात्रा

0
लोणी (प्रतिनिधी) – महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंसिद्धा यात्रेच्या माध्यमातून महिला महोत्सव व बचतगटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लोणी येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जनसेवा फाउंडेशन, पंचायत समिती राहाता, कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडा संकुलात या महिला महोत्सव व बचतगटांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे सौ. विखे यांनी सांगितले.
महिला बचत गटांचे प्रदर्शन व महिला महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या उपस्थितीत आज लोणी येथे प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. उपसभापती बाबासाहेब म्हस्के, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, गटविकास अधिकारी एस. एस. शेवाळे, तालुका कृषी अधिकारी डि. बी. गायकवाड, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. संभाजी नालकर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर. आर. ठाकूर, जनसेवा फाउंडेशनच्या रुपाली लोंढे आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर या सर्व पदाधिकार्‍यांनी प्रदर्शन स्थळाची पाहाणी करून नियोजनाचा आढावा घेतला. प्रदर्शन व महिला महोत्सवाचा शुभारंभ रविवार 3 डिसेंबर रोजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे, सभापती हिराबाई कातोरे, मुख्य कार्यकारी विश्वजित माने, रवींद्र ठाकरे आदी उपस्थित राहणार आहे.
रविवार 3 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत या बचत गटांचे प्रदर्शन व विक्री सुरू राहील. प्रदर्शनामध्ये ज्वेलरी गिफ्ट, टॉईज, विविध प्रकारची खेळणी, शोभेच्या वस्तू, बॅग, पर्स, सोफा कव्हर, शुभेच्छा पत्र, हस्तकला वस्तू, बांगड्या, सौंदर्य प्रसाधने, रेडिमेड गारमेंन्टस, चप्पल, बूट, घोंगडी, पत्रावळी, द्रोण, अक्षदा, मेणबत्ती, प्लॅस्टीक हार, फिनेल, कटलरी, आवळा उत्पादने, विविध मसाले, हुरडा, लोणचे, विविध चटण्या, बेकरी उत्पादने, भाजणीचे पीठ, हातसडीचे तांदूळ, राजूरचे प्रसिध्द पेढे, वनौषधी, कडधान्य, झुणका भाकर,
शिपी आमटी, सामोसे, चकली, वडापाव, थालीपीठ, पावभाजी, आवळा खवा, पुरणपोळी, विविध प्रकारची चिक्की, मांडे व ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू व पदार्थांचे स्टॉल उभारण्यात येणार असून बचतगटांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री देखील या प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार असल्याचे सौ. विखे यांनी सांगितले. या महिला बचत गटांच्या प्रदर्शनात तालुक्यातील महिला बचत गटांनी आपला सहभाग नोंदवावा तसेच नागरिकांनीही या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पदाधिर्‍यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*