कर्मचार्‍यांना प्रतीक्षा नियुक्तीची; जीएसटी लागू झाल्याने करमणूक कर विभाग बंद

0
नाशिक । देशभर सर्व करांमध्ये सुसूत्रता आणि समानता आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्याने करमणूक शुल्क वसुलीची जबाबदारी आता विक्रीकर शाखेकडे देण्यात आली आहे. त्यामुळे विक्रीकर विभागाच्या कर्मचार्‍यांना कोणत्या विभागाकडे वर्ग करायचे याबाबत शासनाचे अद्याप कोणतेही आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त न झाल्यामुळे या विभागातील कर्मचार्‍यांना आता नियुक्तीची प्रतीक्षा आहे.

राज्यातील विविध करमणूक केंद्रांकडून शुल्क वसुलीसाठी करमणूक शुल्क शाखा कार्यरत होती. मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर करमणूक कराची आकारणी केली जाते. चित्रपटगृहे, एक पडदा चित्रपटगृहे, स्थायीवत व फिरती चित्रपटगृहे, व्हिडीओ केंद्र, मनोरंजन उद्याने, जलक्रीडा, व्हिडीओ गेम, पूल गेम, बोलिंग अ‍ॅली, नृत्यबार, गो कार्टिंग, डिस्कोथेक, विदेशी कुस्त्या व व्हिडीओ सुविधा असणार्‍या आराम बसेस अशा विविध प्रकारच्या सेवांवर शुल्कापोटी राज्य सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळत असतो.

आतापर्यंत या विविध प्रकारच्या मनोरंजन केंद्रांचा करमणूक कर वसूल करण्याची जबाबदारी सरकारच्या करमणूक शुल्क शाखेकडे होती. मात्र आता जीएसटीनुसार करमणूक करवसुलीची जबाबदारी विक्रीकर विभागाच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे करमणूक शुल्काची वसुली विक्रीकर विभागामार्फत होणार आहे. यामुळे आता या विभागातील कर्मचारी हातावर हात धरून बसले आहेत.

जीएसटी लागू करून हे कामकाज विक्रीकर विभागाकडे जरी वर्ग करण्यात आले असले तरी या विभागातील कर्मचार्‍यांना कोणत्या विभागात नियुक्ती द्यायची याबाबत शासनाने कोणतेही स्पष्ट निर्देश दिले नसल्याने कर्मचार्‍यांना आता नियुक्तीची प्रतीक्षा लागून आहे. नाशिक जिल्ह्यात करमणूक कर विभागातील 1 तहसीलदार, 1 नायब तहसीलदार, 14 ईडीआय, 2 शिपाई आणि 1 वाहनचालक अशा 22 कर्मचार्‍यांच्या सेवा कुठे वर्ग करायच्या याबाबत मात्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना न मिळाल्यामुळे जिल्हा प्रशासनच पेचात सापडले आहे.

LEAVE A REPLY

*