नाशिक : पोलीस परवानग्यांनाही मुदतवाढ; नव्याने अर्ज करण्याची गरज नाही

नाशिक : पोलीस परवानग्यांनाही मुदतवाढ; नव्याने अर्ज करण्याची गरज नाही

file photo

नाशिक । प्रतिनिधी 

लाँकडाऊनची मुदत वाढल्याने पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये सुरू असलेल्या अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांना देण्यात आलेल्या परवानग्यांनाही ३ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे शहर पोलिस आयुक्तालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. परवानग्यांसाठी अगर मुदत वाढीसाठी नव्याने अर्ज करण्याची गरज नसल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

देशभरात सुरू असलेल्या लॉक-डाऊन येत्या ३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१४) केली. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे गेल्या २३ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या लॉकडाऊनची मुदत मंगळवारी (दि.१४ ) संपत असतानाच, पंतप्रधानांनी हे लाँकडाऊन ३ मेपर्यंत राहील असे घोषित केले आहे.

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्‍यक सेवांना देण्यात आलेली मुभा आणि त्याशिवाय काही नागरिकांना पोलिस कोरोना कक्षामार्फत परवानगी देण्यात आलेली होती. या परवानगीचीही मुदतही आज संपत होती. मात्र लॉक-डाऊन वाढविण्यात आल्यामुळे अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांना देण्यात आलेल्या परवानगीलाही मुदतवाढ द्यावी लागणार होती.

त्यामुळे या नागरिकांसमोर पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्याचा विकल्प होता. परंतु पोलिस आयुक्तालयाने पूर्वीच दिलेल्या परवानगीलाच ३ मे पर्यंत वाढ दिली आहे.

आधीचेच परवानगी पत्र पुढे तीन मे पर्यंत चालणार आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, विनापरवानगी आणि मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com