नाशिक शहरात आपत्कालीन भारनियमन; कोळशाचा पुरवठा घटल्याने वीजनिर्मितीत तूट

0
नाशिक । ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना भारनियमनाचे चटके सहन करावे लागत आहेत. कोळशाचा पुरवठा घटल्याने विजेची निर्माण झालेली तूट आणि वाढती मागणी यामुळे आता ग्रामीण भागासह शहरी भागातही आपत्कालीन भारनियमन सुरू करण्यात आले आहे.

याबाबत नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नसल्याने वीज वितरणविरोधात नागरिकांचा रोष वाढू लागला आहे. याचा परिणाम शहरातील उद्योग, व्यावसायांवर होऊ लागला आहे. आणखी दोन आठवडे हीच परिस्थिती राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यापासून कोल इंडियाकडून पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने महानिर्मितीला मोठा फटका बसला आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी 17 हजार 900 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. मात्र त्यातुलनेत 15 हजार 700 मेगावॅट वीज उपलब्ध होत असून 2200 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने भारनियमनात वाढ करण्यात आली आहे.

राज्यातील बहुतांश भागात पाऊस थांबला असून यंदा चांगले पाणी असल्याने कृषी क्षेत्राकडून पंपांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातही ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला असून विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या महानिर्मितीकडून साडेसहा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होणे अपेक्षित असताना त्यात दोन हजार मेगावॅटहून अधिक घट झाली आहे.

सध्या महानिर्मिती ंकपनीकडून 4700 मेगावॅट, अदानी कंपनीकडून 1700 मेगावॅट, रतन इंडिया 500 मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पांमधून 3400 मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पांकडून सुमारे 1200 मेगावॅट, उरण प्रकल्पातून 380 मेगावॅट, सीपीजीएलकडून 580 मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे.

कोळशाचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागणार आहे. शहरात नागरिक भारनियमनाने त्रस्त झाले असून याविरोधात नागरिक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत.

LEAVE A REPLY

*