भारनियमनाविरोधात उद्रेक : सेनेचा ठिय्या तर राष्ट्रवादीचे गेट बंद आंदोलन

0
शिवसैनिकांना धक्काबुक्की, अधिकार्‍यांचे निलंबन करा, पोलिसांचा माफीनामा

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरात अचानक सुरू झालेल्या भारनियमानाचा उद्रेक काल बुधवारी झाला. शिवसेनेने वीज वितरणाच्या अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयातील वीज बंद करून अंधारातच ठिय्या मांडला होता, तर राष्ट्रवादीने मुख्य गेटला वायर लावून ते गेट बंद केले.

मात्र संबंधित अधिकारी कोणतीच दखल घेत नसल्याचे लक्षत आल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे वीज वितरण कार्यालय व कोतवाली पोलीस ठाणे येथे मोठ्या प्रमाणात घोषणा व गोंधळ पाहावयास मिळाला.

भारनियमन बंद करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने काल सकाळी अकरा वाजता सर्व पदाधिकारी, नगरसेवक महावितरण कार्यलयात निवेदन देण्यास गेले. यावेळी शिवसेनेने उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, सभागृह नेता गणेश कवडे, योगीराज गोडे, विक्रम राठोड, दिगंबर ढवण, भगवान फुलसौंदर, आशा निंबाळकर यांच्यासह मोठ्या संख्यने शिवसैनिक जमले होते. यावेळी घोषणाबाजीने वीज वितरण कार्यालय दणाणून सोडले गेले.

दरम्यान राष्ट्रवादीच्या वतीने सकाळी 11 वाजता वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन सुरू करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, अजय चितळे, बाबा गाडळकर, सूरज जाधव आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी मुख्य गेट बंद करून आंदोलन केले.

दरम्यान, शिवसेना आत व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाहेर अशी स्थिती होती. एकाचवेळी आंदोलन सुरू असल्यामुळे वीज वितरण कार्यालयात मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान पोलिसांनी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळाचा वापर करत वाहनात बसविले. यावेळी कार्यकर्ते वाहनात बसतात न बसतात तोच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी समोर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या विरोधात घोषणबाजीस सुरुवात झाली.

या प्रसंगी शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या आवारात एकमेकांविरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी तातडीने शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी वीज वितरण कार्यालयातून बाहेर पडताना पोलिसांनी शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, विरोधी पक्षनेते गणेश कवडे यांना धक्काबुक्की केली आणि वाहनात घालून पोलीस ठाण्यात आणले.

त्याच बरोबर माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना वाहनात बसवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांना याबाबतचे कारण विचारले असता कोणतेही कारण त्यांना देता न आल्याने माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर उपोषणात बसले. धक्काबुक्की करणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी राठोड यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनातून कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. तेथे दाखल होताच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाली. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना जुन्या इमारतीत बसविले होते. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

मात्र शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना पोलीस ठाण्यात का आणले? धक्काबुक्की करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे तातडीने निलंबन करावे, या मागणीसाठी राठोड यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच उपोषण सुरू केले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिंकांत गाडे यांनी मध्यस्थी करत थेट जिल्हा पोलीसप्रमुखाचे कार्यालय गाठले.

यावेळी त्यांनी झालेल्या सर्व प्रकारांवर चर्चा केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी उपोषणास बसलेल्या माजी आमदार अनिल राठोड व सर्व शिवसैनिकांची माफी व दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या वादावर पडदा पडला.

अप्पर पोलीस अधीक्षकांनी केली दिलगिरी व्यक्त – 
कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू झालेले उपोषण चिघळ्ण्याची शक्यता व्यक्त होत असताना, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान तेथील सर्व परिस्थिती राठोड यांच्याकडून जाणून घेत त्यांनी थेट जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्याकडे तक्रार केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी आंदोलकांची भेट घेत, माफी मागून दिलगिरी व्यक्त केली. त्यावेळी राठोड यांनी झालेल्या प्रकराबाबत नाराजी व्यक्त करत उपोषण सोडले.

बळाचा वापर – राठोड
शिवसेनेच्या वतीने नेहमी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जातो. शहरातील भारनियमन बंद करावे या मागणीसाठी आम्ही वीज वितरण कार्यालयात गेलो होतो. त्याठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना सामान्य नागरिकांसाठी लढणारी संघटना असल्याचे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

वरिष्ठांकडे तक्रार –
भारनियमाच्या विरोधात आंदोलन करण्यास गेलेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांबाबत झालेल्या प्रकरणाची सर्व माहिती शिवसेनेचे मंत्री रामदास कदम, दीपक केसकर तसेच वरिष्ठ पदाधिकारी व मंत्र्यांना फोनवरून देण्यात आली. दरम्यान पदाधिकारी व शिवसैनिकांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी ताताडीने त्या अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करण्याची कारवाई करावी अशी मागणी यावेळी राठोड यांनी वरिष्ठाकडे केली.

 

LEAVE A REPLY

*