निवडणूक कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास कर्मचार्‍यास मिळणार सानुग्रह अनुदान

0

संगमनेर (वार्ताहर) – राज्यातील निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कर्तव्य बजावत असताना कर्मचार्‍यांना मृत्यू अथवा अपघातात जखमी झाल्यास संबंधितांना सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात शासनाने निर्णय जारी केला आहे. सदरचे सानुग्रह अनुदान हे इतर लाभाच्या व्यतिरिक्त देण्यात येणार आहे.

सध्या देशातील लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान विविध विभागाच्या कर्मचार्‍यांना निवडणूक आयोगाकडे प्रतिनियुक्ती देण्यात येते. संबंधित कर्मचार्‍यांना प्रशिक्षणादरम्यान किंवा मतदान प्रक्रियेच्या संबंधित प्रक्रिया पूर्ण करताना, जाताना अथवा घरी येईपर्यंत जीविताला धोका निर्माण झाल्यास अथवा अपघात झाल्यास शासनाने सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.

त्यानुसार कर्मचार्‍यांचा निवडणूक प्रक्रिया करताना किंवा निवडणूक कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाल्यास 15 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तर नक्षलवादी हल्ला, बॉम्बस्फोट किंवा इतर हल्ले झाल्यास त्यात मृत्यू आल्यास 30 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या स्वरूपातच बॉबहल्ला, नक्षलवादी हल्ला यासारख्या घटनेत जखमी झाल्यास संबंधित कर्मचार्‍याला 15 लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळेल, तर एखादा अवयव निकामी झाल्यास संबंधित कर्मचार्‍यांना साडेसात लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे आदेशित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाल्यासही मिळणार अनुदान – 
राज्यात सध्या निवडणुकांचे वारे सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरील निवडणूक प्रक्रियेसंबंधी वेगाने काम सुरू आहे. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाच्या दरम्यान काही ठिकाणी अपघात होऊन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशिक्षणावरती असताना कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला असेल तर अशा कर्मचार्‍यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यात प्रशिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर झालेल्या अपघातग्रस्त कुटुंबीयांना शासनाच्या या निर्णयाचा लाभ होऊ शकणार आहे.

सानुग्रह अनुदान केवळ विधिमंडळ व संसदीय निवडणुकीसाठी – 
कर्मचार्‍यांच्या संदर्भाने अपघात व मृत्यू झाला असल्यास सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भातचा शासन निर्णय राज्य शासनाने काढला असला, तरी या शासन निर्णयाचा लाभ केवळ राज्यसभा, लोकसभा, विधानसभा व विधानपरिषद निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असणार आहे. त्यामुळे इतर निवडणूक प्रक्रियेत कर्मचारी सहभागी झाल्यास आणि दुर्दैवी प्रसंग उदभवल्यास अशा स्वरूपाचे सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही.

LEAVE A REPLY

*