निवडणुकीची तयारी.. सेनेची वाजली तुतारी

0

कोन दृष्टीकोन, संदीप रोडे 9423162300

गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज मेळावा

केंद्रातील भाजप सरकारच्या हालचाली पाहता राज्यात केव्हाही विधानसभेची निवडणूक होऊ शकते. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने तयारी चालविली असून नगरमध्ये त्याचा बिगुल राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाजविला जाणार आहे. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या उमेदवारीवर अगोदरच आदित्य ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केल्याने शिवसेनेचा आजचा मेळावा म्हणजे निवडणुकीची तूतारी वाजल्यात जमा आहे.

गत 25 वर्षे शहरावर अधिराज्य गाजविणार्‍या अनिल राठोड यांना गत विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव पत्कारावा लागला. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर पराभव राठोड यांच्या जिव्हारी लागला. आता विधानसभा जिंकायचीच असा ‘पण’ करून राठोड यांनी तयारी चालविली आहे. गत महिन्यात युवा सेनेचे प्रमुख अदित्य ठाकरे यांनी राठोड यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन नगरकरांना करतानाच राठोड यांच्या उमेदवारीवर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले.

तेव्हापासून राठोड पायाला भिंगारी लागल्यागत शहरात रपेट सुरू आहे. शिवसैनिकही जोमाने कामाला लागले आहेत.
सेनेतून अन्य पक्षात गेलेले व अन्य पक्षातील मातब्बरांना शिवसेनेत प्रवेश देऊन संघटना बळकट केली जात आहे. भिंगार, केडगाव, सावेडी उपनगरात अनेकांना प्रवेश देत राठोड यांच्या विधानसभेसाठी शिवसेनेकडून पायाभरणी सुरू आहे. आजही तोफखान्यातील राजूमामा जाधव यांचा गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी वर्षाचा कालावधी बाकी आहे.

राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही त्याचवेळी घेण्याचे घाटत आहे. राज्यात केव्हाही विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, हे गृहीत धरून शिवसेना तयारीला लागली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘अकेला चलो’चा नारा कार्यकारीणीच्या बैठकीत पूर्वीच दिला आहे. त्यामुळे कोणाची वाट न पाहता नगरमध्ये अनिल राठोड कामाला लागले आहेत.
…………….
गुलाल घेण्यासाठी…!
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अहमदनगर महापालिकेची निवडणूक होणार आहे. आज महापालिकेत सत्ता असली तरी विधानसभेचा गुलाल अंगावर घेण्यासाठी शिवसेनेला पुन्हा एकदा महापालिका ताब्यात ठेवावी लागेल. त्या पार्श्‍वभूमीवर मेळाव्यात कोण काय वक्तव्य करणार याकडे नगरकरांचा लक्ष लागून आहे.
…………….
गुलाबराव पाटलांच्या घोषणेकडे लक्ष
गुलाबराव पाटील म्हणजे शिवसेनेची बुलंद तोफ आहे. शिवसैनिकांच्या आज सायंकाळी होणार्‍या मेळाव्यात ते काय तोफगाळा डागणार अर्थात आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काय घोषणा करणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
……………….
महापालिकेत 40 लाख रुपयांचा स्ट्रीट लाईट घोटाळा, रखडलेल्या घनकचरा प्रकल्पाला झालेला 50 लाख रुपयांचा दंड आणि स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यावरून सुरू असलेले घमासान यावर शिवसेनेची कोंडी झाली आहे. ही कोंडी कशी सुटणार, त्यावर गुलाबराव पाटील काय बोलणार याची उत्सुकता नगरकरांना आहेच.

 

LEAVE A REPLY

*