इगतपुरी, त्र्यंबक नगरपालिका निवडणुकीसाठी अधिसूचना जारी; उद्यापासून भरता येणार उमेदवारी अर्ज

0
नाशिक । त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असून या दोन्ही ठिकाणी गुरुवार (दि. 16)पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 22 नोव्हेंबर आहे. या दोन्ही नगरपालिका रणधुमाळीस प्रारंभ झाला असून इच्छुक उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने गत आठवड्यात त्र्यंबकेश्वर व इगतपुरी नगरपालिकांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर या दोन्ही ठिकाणी इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली होती. या दोन्ही ठिकाणी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारांना गुरुवारपासून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

आगामी विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अद्यापही कोणतीच युती अथवा आघाडीची चर्चा न झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने त्यादृष्टीनेही राजकीय पक्षांतर्गत खलबते सुरू झाली आहेत. त्यामुळेच येत्या काळात दोन्ही नगरपालिका क्षेत्रातील राजकीय वातावरण अधिक तापणार आहे.

सटाण्यात पोटनिवडणूक : सटाणा नगरपालिकेतील प्रभाग 5 अ च्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तेथेही गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या प्रभागात 2 हजार 577 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 1284 तर महिला मतदारांची संख्या 1293 इतकी आहे.

LEAVE A REPLY

*