Type to search

माझं नाशिक

सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न – आमदार राजाभाऊ वाजे

Share

विकासाची प्रक्रिया पुढे नेणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारीच आहे. परिसराच्या जीवन मानावर, पुढच्या पिढीच्या भविष्यावर परिणाम करू शकेल अशी विकासकामे माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात अशीच कामे करण्यावर माझा भर असून विकास केवळ दिसायला नको तर तो प्रत्यक्ष जाणवला पाहिजे यावर माझी श्रध्दा आहे. त्याच दिशेने माझे काम सुरु असून. सिन्नर तालुक्यासह टाकेद जिल्हा परिषद गटाच्या विकासावर मी लक्ष केंद्रित केले आहे.

कायम दुष्काळाने पिचलेला सिन्नर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व दरवर्षी पडणार्‍या पावसाचा विचार करता तालुक्यात नवे धरण बांधणे अवघड आहे. आपल्याकडे आहेत, त्याच साधनांचा नियोजनपूर्वक वापर करुन समाधान शोधण्याचा मी प्रयत्न करतो आहे.

तालुक्यातून वाहणार्‍या कडवा कॅनॉलची गळती थांबवण्यासह कॅनॉलची दुरुस्ती करण्यासाठी 53 कोटींचा निधी मंजूर करून आणला. त्यापैकी 43 कोटींचा खर्च झाला असून, गळती थांबण्याबरोबरच कॅनॉलच्या शेवटच्या टोकास 30 दिवसांनी पोहचणारे पाणी तिसर्‍या-चौथ्या दिवशी पोहचू लागले आहे. या कालव्यातून वर्षातून जेमतेम दोन आवर्तने शेतकर्‍यांना मिळायची. माझ्या कार्यकाळात तीन, अगदी चौथेही आवर्तन सुटू लागले आहे.

माजी आ. सूर्यभान गडाख, माझ्या आजी, माजी आमदार कै. रुक्मिणीबाई वाजे, अ‍ॅड. सुदामदाजी सांगळे यांच्या पुढाकाराने 1972 च्या दुष्काळात गावा-गावांमध्ये तयार पाझर तलाव, बंधारे बांधले गेले. तथापि ते गाळाने भरल्याने त्यांची साठवणूक क्षमताच कमी झाली होती. गाळ काढण्यासाठी ‘युवा मित्र’ ‘टाटा ट्रस्ट’च्या सहाय्याने मोहीम आखली. राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजनाही आली.

या दोन्ही योजनांचा लाभ घेत तालुक्यातील जास्तीत जास्त धरणे, बंधार्‍यांचा गाळ काढण्यावर भर दिला. संपूर्ण जिल्ह्यात सिन्नर तालुक्याची भूजल पातळी 2 मीटरने वाढली असल्याचा निष्कर्ष शासकीय यंत्रणेने काढला आहे. यंदा अभिनेते आमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनने वॉटर कप स्पर्धेत सिन्नर तालुक्याचा समावेश केल्याने उत्साह अजूनच वाढला. यंदाच्या पावसाळ्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील असा मला विश्वास आहे.

9 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीतून उपजिल्हा रुग्णालयाची प्रशस्त इमारत साकारली जात आहे. सोमठाणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत आधीपासूनच दिमाखात उभी आहे. मात्र, तेथे अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्तीच झाली नसल्याने ही इमारत आजही धूळखात पडून आहे.

तशी वेळ ग्रामीण रुग्णालयावर येऊ नये, यासाठी उपजिल्हा रुग्णालयासह सोमठाणेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीही वैद्यकीय अधिकार्‍यांसह सर्व अधिकारी कर्मचार्‍यांच्या नियुक्तीस शासनाकडून मंजुरी मिळवून आणली आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक ती सर्व अद्ययावत यंत्रसामग्रीही शासनाने मंजूर केली आहे. दोन-तीन महिन्यांत ही दोनही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सिन्नरकरांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी सज्ज होतील.

माजी आमदार सूर्यभान गडाख यांनी तालुक्यातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र देवपूरमध्ये सुरू केले होते. या केंद्राची नवी अत्याधुनिक इमारत उभी रहावी, यासाठी 4 कोटी 7 लाखांचा निधी मिळवला. त्यातून सुसज्ज अशी इमारत उभी राहिली आहे. वावीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रालाही नवी इमारत मिळावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. डुबेरेत प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणण्यात यशस्वी ठरलो आहे.

दोडीच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी 24 तास तेथे उपलब्ध असतील अशी व्यवस्था केली. तालुक्यातील शवविच्छेदनाची एकमेव व्यवस्था नगरपालिकेच्या दवाखान्यातच उपलब्ध होती. त्यामुळे रुग्णांची गैरसोय व्हायची.दोडीच्या रुग्णालयातही शवविच्छेदनाची व्यवस्था सुरू करण्यात यशस्वी ठरलो. मतदार संघातील रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करतो आहे.

मतदार संघातील रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना साडेतीन वर्षांत 3 कोटी 15 लाख 82 हजार रुपयांची मदत मिळवून दिली आहे. एवढी विक्रमी मदत मिळणारा सिन्नर मतदारसंघ राज्यातील एकमेव मतदार संघ ठरला आहे.

माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी युती शासनाच्या काळात तालुक्यात 100 कोटींच्या पाणीपुरवठा योजना आणल्या होत्या. या योजनांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. या योजनांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करतो आहे. बारागाव पिंप्रीसह 7 गाव योजनेसाठी 6 कोटी 93 लाखांचा निधी आणून ही योजना नव्याने पूर्णत्वाला नेली आहे. मनेगावसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेत भोकणी, देवपूर, धोंडविरनगर, फर्दापूर, पांगरी खूर्द, कुंदेवाडी या 6 गावांचा समावेश करीत, या योजनेच्या नूतनीकरण व दुरुस्तीसाठी 20 कोटी 34 लाख 81 हजारांचा निधी मंजूर करुन आणला आहे. नव्या योजनेत एकूण 22 गावांबरोबरच जवळपास 44 वाड्यांचाही समावेश केला आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून विंचूर दळवीच्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी एक कोटी 39 लाख 70 हजार, पांढुर्लीच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 68 लाख, वडगाव पिंगळा नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 76 लाख 71 हजार तर नांदूरशिंगोटे नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 17 लाख 14 हजार रुपये मंजूर करुन आणले आहेत.

टाकेद जिल्हा परिषद गटातील सर्व गावे व वाड्या-वस्त्यांना पिण्यांचे पाणी आणि वीज मिळावी याला प्राधान्य दिले आहे. सिन्नर शहरास 24 तास पाणीपुरवठा करू शकेल, अशी कडवा धरणावरील योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न करतो आहे. कडवा धरणावरील जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले असून, मुख्य पाईप लाईन टाकण्यातले 90 टक्के अडथळे शेतकर्‍यांची समजूत घालून मिटवण्यातही यशस्वी झालो आहे. उर्वरित पाईप लाईन टाकण्याबरोबरच वीज कनेक्शनचे काम अंतिम टप्प्यात आले.

तालुक्यात 30 तलाठी व 5 मंडल कार्यालये बांधून तयार झाली आहेत. अभ्यासिकेची चळवळ संपूर्ण तालुक्यातच वेगाने फोफावते आहे. शहामध्ये 132 के.व्ही.चे विज केंद्र मंजूर झाले असून, त्याच्या उभारणीची प्रक्रिया शासनस्तरावर सुरु झाली आहे. वावीचे अत्याधुनिक बसस्थानक, नांदूरशिंगोटेत स्व. गोपीनाथजी मुंडे यांचे स्मारक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 43 कि.मी. चे नवे रस्ते अशी विकासकामे तर होतच राहतील. मात्र, विकास केवळ दिसायला नको तर जाणवला पाहिजे.

अन्यायकारक घरपट्टी कमी करण्याचा शब्द मी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सिन्नर शहरातील रहिवाशांना दिला होता. त्यादृष्टीने अंतिम कार्यवाही सुरू असून, ड्रोनद्वारे शहरातील सर्व मालमत्तांचे सर्व्हेक्षणही पूर्ण झाले आहे. घरोघर प्रत्यक्ष भेट देऊन मालमत्तांची मोजणी करण्याचे काम आटोपताच पुढील पाच वर्षांसाठी नव्याने घरपट्टी लागू करण्याची प्रक्रिया सुरू होईल. अन्यायकारक घरपट्टीतून सर्व सिन्नरकरांची सुटका होईल असा मी शब्द देतो. बंदिस्त गटारींसह शहरासह उपनगरांचे सर्व रस्ते व्हावेत यासाठी नियोजन केले आहे. विजयनगरचे सर्व रस्ते चकचकीत झाले आहेत. विजयनगरसह सरदवाडी रस्त्यावरील मोरेनगरमध्ये अत्याधुनिक ओपन जीम सुरू झाली आहे.

सरदवाडी धरणाच्या बंद पडलेल्या डाव्या व उजव्या पाटाच्या जागेवर जॉगिंग ट्रॅक उभारण्याचे काम सुरू आहे. सरस्वती नदीच्या पुनर्जिवनासह नूतनीकरणाचे काम सुरु आहे. खासदार पूल ते बाराद्वारीपर्यंत नदीच्या कडेनेही जॉगिंग ट्रॅक उभारला जात आहे. मुक्तेश्वरनगरमध्ये 22 गुंठे जागेवर वारकरी भवनाचे काम सुरू आहे.

संगमनेर नाक्यावरील जुन्या स्मशानभूमीचे जवळपास दिड-दोन कोटी रुपये खर्चून विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. वावी वेस ते गणेश पेठ, नेहरु चौक मार्गे बसस्थानक रस्त्याचे बंदिस्त गटारीसह मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु झाले आहे. बाराद्वारी, नागेश्वरी व डुबेरे नाका या तीनही दशक्रिया विधीच्या जागांचेही विस्तारीकरण व विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून तेथेही लवकरच कामे सुरु होतील. सरदवाडी रस्त्यावरील उपनगरांमध्ये रस्त्यांची कामे सुरु आहेत. या रस्त्यावर भरणारा भाजी बाजार, भाजी मंडईत सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गंगावेस ते मापरवाडी (नायगाव रोड) या सर्वाधिक दुर्दशा झालेल्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे टेंडर झाले असून हे काम लवकरच सुरु होईल. गंगावेस भागातील नगर परिषदेच्या व्यापारी संकुलाचे बंद असलेल्या कामासाठी निधी उपलब्ध केला असून, हे कामही लवकरच वेग घेईल. तळवाडीतील तळ्यासह साडे तेरा एकर जागेवर अद्ययावत असे गार्डन उभारण्याचेही नियोजन सुरु आहे.

गंगावेस व वावी वेस या शहराच्या मुख्य दोन प्रवेशद्वारांचे व शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नगर परिषदेच्या कार्यालयातील मासिक बैठकांसाठी मंत्रालयाच्या धर्तीवर अत्याधुनिक अशा प्रशस्त सभागृहाचे काम वेगाने सुरु आहे. विजेच्या लंपडावापासून शहरवासियांची सुटका व्हावी यासाठी 32 के.व्ही.चे अतिरिक्त वीज उपकेंद्र सरदवाडी रस्त्यावर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शंकरनगर, गणेश नगरसह परिसराचे रुप यापूर्वीच पालटले आहे.

नारायण देव बाबा मंदिरामागील इंदिरानगरसह परिसरातील झोपडपट्टीचाही चेहरा-मोहरा लवकरच बदलणार आहे. पेव्हर ब्लॉकसह बंदिस्त गटारी, चकाचक रस्ते तिथेही लवकरच बघायला मिळतील. संपूर्ण शहरवासियांना अभिमान वाटावा असे विकसित झालेले सिन्नर शहर सर्वांना बघायला मिळेल याची मला खात्री आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!