ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता : उमेदवारी दाखल करतेवेळीच्या शक्तीप्रदर्शनास चाप

0

उमेदवाराचे वाहन दुसर्‍यांना वापरता येणार नाही

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात व्हाव्यात यासाठी अन्य निवडणुकांप्रमाणेच आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. त्यानुसार उमेदवारी दाखल करतेवेळी उमेदवारासोबत तीन किंवा अधिक व्यक्ती असून नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीसाठी अनेक उमेदवार, पक्ष तसेच संघटनांकडून शक्तीप्रदर्शन केले जाते.

पण तसे यंदा होणार नाही. या नियमामुळे अनेकांना शक्तीप्रदर्शनाच्या मोहापासून मुरड घालावी लागणार आहे.
तसेच एका उमेदवरास प्रचारासाठी एक चारचाकी किंवा दोन दुचाकी वाहनांची परवानगी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एका उमेदवाराने प्रचारासाठी परवानगी घेतलेले वाहन दुसर्‍या उमेदवारास वापरता येणार नाही.

आचारसंहिता लगतच्या गावात लागू असलीतरी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात निवडणुका नसतील, त्याठिकाणी विकासाच्या विविध कामांवर कसलेही निर्बंध राहणार नाहीत. ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रत्येक प्रभागासाठी उमेदवाराला एक प्रचार कार्यालय उघडण्याची परवानगी मिळणार आहे. त्यासाठी वीज पुरवठ्याची परवानगी महावितरणकडून घ्यावी लागणार आहे.

प्रचारासाठी वाहन परवानगी देताना तालुकास्तरीय आचारसंहिता पथक त्यावाहनाची नोंदणी प्रमाणपत्र, कर भरलेले पुस्तक तपासून परवानगी देणार आहे. संवेदनशील भागात व्हिडिओ कॅमेरा वापरण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. तहसील क्षेत्रामधील आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी तहसिलदार व प्रांताधिकार्‍यांकडे सोपविण्यात आली आहे.

दारू, मटणांच्या पार्ट्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त –
निवडणूक काळात वाड्या, वस्त्यांवर मद्य व मटणाच्या पार्ट्या चालतात. तेथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गस्त घालण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तसेच दारू उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, काळा गूळ, नवसागर या पदार्थांच्या साठवण करणार्‍या व्यापार्‍यांवरही नजर ठेवण्यात येणार आहे.  

  • उमेदवारी दाखल करतेवेळी केवळ दोनच व्यक्ती नेता येतील
  •  प्रचार कार्यालयाच्या विजेसाठी महावितरणची परवानगी आवश्यक
  • नोंदणी प्रमाणपत्र व कर भरल्याची खात्री झाल्यानंतरच वाहनासाठी परवानगी
  • संवेदनशील भागात व्हिडिओ कॅमेरे लावणार

LEAVE A REPLY

*