निवडणुकीनंतर पक्ष विरहीत राजकारण व्हावे

0

शालीनीताई विखे: पंचायत संमेलनाला मोठा प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 1942 ला स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांच्या विरोधात चलेजावचा नारा दिला. 1942 ते 1947 या पाच वर्षात अखंड संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. 1942 ला सुरू केलेल्या लढ्याला यंदा 75 पूर्ण होत असून या निमित्ताने आता देशात भ्रष्टाचार, जातीयवाद, अस्वच्छतावाद, दहशतवाद निर्मूलनासाठी लढा देण्याची वेळ आली आहे. 2022 पर्यंत हे संपवण्याचे आवाहन असून याची सुरूवात करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निवडणुकीनंतर पक्षविरहित राजकारण करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्यावतीने पंचायत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून अध्यक्ष विखे बोलत होत्या. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, उपाध्यक्ष राजश्री लंघे, सभापती अजय फटांगरे, अनुराधा नागवडे, उमेश परहर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, विशेष निमंत्रित अ‍ॅड. रंजना गवांदे, जिल्हा परिषद सदस्य, सदस्या, पंचायत समिती सभापती, सदस्य, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आदी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
अध्यक्षा विखे म्हणाल्या, पंचायत राज व्यवस्थेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना प्रत्येकाच्या जबाबदार्‍या काय आहेत हे ओळखून कामे व्हावीत. निवडणुकीनंतर राजकारणविरहीत कामे व्हावीत. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून फिरताना असे आढळून आले की, जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतच्या मुलांना स्वातंत्र्य सैनिकांचा फोटो ओळखता येत नाही. यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याच्या उपयोग काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महात्मा गांधी यांचे स्वप्न साकारायचे असल्यास सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे. जातीपाती पलिकडे जाऊन सामाजिक सलोखा राखत कामे व्हावीत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीत केवळ भ्रष्टाचाराविरोधात शपथ घेऊन चालणार नाही. यासाठी प्रत्येकाने निश्‍चय करून काम करण्याची वेळ आली आहे. बुवाबाजी, अंधश्रध्देला थारा असता कामा नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी अ‍ॅड. गवांदे यांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार, जातीयवाद, अस्वच्छतावाद, दहशतवाद निर्मूलन, अंधश्रध्दा या विरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे. यासह बाल विवाह रोखले जावेत. नापीक शेती, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार ते काल परवाच्या तिहेरी तलाक, तरुणांची व्यसनाधिनता याविषयी चिंता व्यक्त करत त्यावर उपायही सूचवले. यावेळी दारूतून मिळणार्‍या महसुलातून 5 टक्के रक्कम दारूबंदीच्या प्रबोधनासाठी राखीव ठेवण्याची मागणी गवांदे यांनी केली.
डॉ. कोल्हे यांनी विकासाची व्याख्या सांगताना केवळ पायाभूत विकास म्हणजे विकास नसून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास देखील होेणे आवश्यक असल्याचे मत नोंदवले. यावेळी सभापती नागवडे यांचेही भाषण झाले.संमेलनाची रूपरेषा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विषद केली. तर आभार उपमुख्य कार्याकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रशांत शिर्के यांनी मानले.

देशाच्या सिमेवर अखंड पहारा देणार्‍या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन अध्यक्षा विखे यांनी यावेळी केले. यासह भाविकांनी गणेश उत्सव काळात तुरटीचा गणपती, इको फ्रेन्डली गणपतीची स्थापना करावी, असे आवाहन केले.
जिल्ह्यात अनेक तालुक्यांत जागेअभावी घरकुलांचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी असा घरकुलांच्या जागेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, अशा सर्वांना सोबत घेऊन जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे विखे यांनी यावेळी सांगितले.
पंचायत संमेलनाला पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, दिलीप गांधी, आ. बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, विजय औटी, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, संग्राम जगताप, राहुल जगताप यांना निमंत्रीत करण्यात आले होते. यातील केवळ आ. कांबळे यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*