जिल्हा नियोजन समिती निवडणूक : आज चित्र स्पष्ट होणार

0

माघारीचा शेवटचा दिवस

अहमदनगर (प्रतिनिधी) – नियोजन समितीच्या रिक्त असणार्‍या 36 जागासाठी 28 ऑगस्टला मतदान होणार आहे. यापूर्वी नियोजन समितीच्या 8 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 24 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज सोमवार उमेदवारी अर्ज माघारीसाठी शेवटचा दिवस असून यात कोण-कोण माघार घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रविवारी नगरमध्ये नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षाची बैठक होणार होती. मात्र, ती न झाल्याने नियोजन  समितीच्या निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

जिल्हा नियोजन समितीत रिक्त असणार्‍या जागांवर आपल्या पक्षाच्या अधिकाधिक सदस्यांची वर्णी लागावी, यासाठी सर्व पक्षांनी कोट्यापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज भरले आहेत. नियोजन समितीच्या जिल्हा परिषद मतदार संघातील 32 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्या असल्यातरी सर्वसाधारण प्रवर्गात पुरूषांच्या आणि महिलांच्या जागा कोणाच्या वाट्याला जाणार यावरून तेढ निर्माण झालेली आहे.

सर्वच पक्षांकडून खुल्या प्रवर्गातील सदस्यांना समावून घेण्याचा आग्रह होत असल्याने नियोजन समिती बिनविरोध होण्यास अडचण निर्माण झाली आहे. रविवारी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सर्व पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने ही बैठक झाली नाही. यामुळे नियोजन समितीसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. आज उमदेवारी अर्ज माघारीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत असून या वेळेत अपेक्षीत माघार न झाल्यास नियोजन समितीसाठी निवडणुक अटळ आहे.

जिल्हा नियोजन समितीमधील जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुक बिनविरोध झाली तरी नगरपालिका आणि नगरपरिषद मतदारसंघातील 4 जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. या ठिकाणी उमदेवारांची संख्या अधिक असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कोणीच प्रयत्न केलेले नाही. यामुळे या ठिकाणी निवडणुक अटळ असल्याचे सांगण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*