बिनविरोधसाठी दंड‘बैठका’! : जिल्हा नियोजनसाठी पडद्याआड हालचाली

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त जागांसाठी 28 ऑगस्टला मतदान होणार आहे. निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारीसाठी उद्या सोमवार (दि.14) शेवटची मुदत आहे. नियोजन समितीत जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्व पक्षांना कोटानिहाय सदस्यत्व मिळाल्यास ही निवडणुक बिनविरोध होणे शक्य आहे. यासाठी पडद्याआड हालचाली सुरू झाल्या आहेत. रविवारी बहुतांशी पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त असणार्‍या 36 जागांपैकी जिल्हा परिषद मतदारसंघातील 32 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना इच्छुकांची संख्या वाढल्याने ही निवडणुक बिनविरोध होणार की नाही, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. सर्वच पक्षांनी जिल्हा परिषदेतील त्यांच्या सदस्य बळापेक्षा अधिक अर्ज भरल्याने निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे. 32 जागांसाठी सर्व पक्ष मिळून 47 उमदेवारी अर्ज दाखल झाले होते. यातही 8 जागांवर एकच उमेदवारी अर्ज दाखल असल्याने या 8 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. तर छाणनीत काँग्रेसचे 2 आणि भाजपचा 1 अर्ज बाद झालेला आहे. आता नियोजन समितीच्या 24 जागांसाठी 39 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

जिल्हा परिषदेत असणार्‍या सदस्य बळानुसार सर्व पक्षांचा कोठा ठरलेला आहे. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असणार्‍या काँग्रेसच्या वाट्याला 10 जागा असून यातही विखे-थोरात यांच्या सदस्य बळानुसार विखे यांच्या वाट्याला 6 तर थोरात यांच्या वाट्याला 4 जागा निश्‍चित आहेत. दरम्यान, बिनविरोध झालेल्या सदस्यांमध्ये विद्यमान अध्यक्षा शालिनीताई विखे, कविता लहारे, दिनेश बर्डे (काँग्रेस) तेजश्री लंघे (राष्ट्रवादी), ललिता शिरसाठ आणि संध्या आठरे, कांतिलाल घोडके आणि सोमीनाथ पाचरणे (भाजप) यांचा समावेश आहे.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसमधील एक गट आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्यात शनिवारी रात्री मुंबईत बैठक होणार होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर आज रविवारी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील काही जागांवरून पेच असून त्यावर सर्व पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सर्वच पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसमधील विखे आणि थोरात गटात कशा तडजोडी होता, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. यासह शिवसेनेला देण्यात येणार्‍या जागांमध्ये संदेश कार्ले, काशिनाथ दाते व अनिल कराळे यांना कशा प्रकारे समावून घेतात यावर बिनविरोधचे गणित अवलंबून राहणार आहे.

काँग्रेस 15 (छानणीत दोन अर्ज बाद), राष्ट्रवादी 10 अर्ज, भाजप 11 अर्ज (छानणीत एक अर्ज बाद), सेना 6 अर्ज, क्रांतीकारी शेतकरी पक्ष 2 अर्ज, महाआघाडी 1 अर्ज, कम्युनिष्ठ 1 अर्ज आणि जनशक्ती 1 अर्ज यांचा समावेश आहे.
ठरलेल्या कोट्यानूसार जिल्हा नियोजन समितीत जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसला 10, राष्ट्रवादी 8, भाजप 6, सेना 3, क्रांतीकारी शेतकरी पक्ष 2 असे 29 सदस्यांना प्रतिनिधीत्व मिळणार आहे. मात्र, महाआघाडीने 1 आणि जनशक्ती-कम्युनिष्ठ पक्षाने प्रत्येकी 1 जागेसाठी अर्ज दाखल केलेला असल्याने या तिघांना कोणता पक्ष समावून घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
जिल्हा नियोजन समितीमधील जिल्हा परिषदेच्या 32 जागांची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. मात्र, नगरपालिका आणि नगर परिषद मतदारसंघातील 4 जागांसाठी जादा अर्ज आलेले आहेत. या ठिकाणी निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता धूर असल्याचे भाजपाच्या एका पदाधिकार्‍यांने ‘सार्वमत’शी बोलताना स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*