बंद दाराआडची चर्चा गुलदस्त्यात

बंद दाराआडची चर्चा गुलदस्त्यात

मुंबई – 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी 40 मिनिटे चर्चा केली. या बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर खडसे यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.

भाजपचे सरकार असतानाही गेल्या पाच वर्षांत भाजप नेते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांचे स्मारक उभारता आले नाही, अशा शब्दात खडसे यांनी हल्ला चढवला. आपण नाराज नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एकनाथराव खडसे यांनी सोमवारी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केली होती. त्यानंतर मंगळवारी मुंबईत आल्यावर त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली.

या दोन्ही नेत्यांना भेटल्यावर आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दुसरीकडे खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवल्याने खडसे अद्यापही नाराज असल्याचं बोलले जात आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले की, आपण नाराज असल्याची बातमी चुकीची आहे. शरद पवार यांची मी जळगावमधील सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी गेला होतो.

उद्धव ठाकरेंशीही त्याबाबतच चर्चा केली. तसेच 12 तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी आपण आलो होतो.

गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबाद येथे उभे राहावे यासाठी आपण जमीन उपलब्ध करुन दिली होती. मात्र स्मारक अद्याप उभे राहू शकलेले नाही. या स्मारकासाठी जास्त नाही 30 ते 40 कोटींचा खर्च आहे.

मी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या माध्यमातून घोषणा व्हावी अशी विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. आम्ही प्राधान्याने स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.

नवीन ‘माधवम’ पक्षाची चर्चा

भाजपमधील नाराज मंडळी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे व इतर एकत्र येऊन 12 डिसेंबर रोजी माधवम पक्षाची स्थापना करणार असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरु आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात संदेश व्हायरल होत आहे. मात्र, खरच असा पक्ष तयार होणार का? हे 12 डिसेंबर रोजीच दिसणार आहे.

मनोहर जोशींचा बॉम्बगोळा

भाजपा आणि शिवसेना यांची विचारसरणी सारखीच असून भविष्यात भाजपा-शिवसेना एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी प्रतिक्रिया माजी

मुख्यमंत्री व शिवसेना नेते 

मनोहर जोशी यांनी व्यक्त केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जोशींच्या या वक्तव्यावर आघाडीच्या नेत्यांची अद्याप प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

केंद्रात सेनेचे तळ्यात-मळ्यात

लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व विधेयकाच्या बाजुने मतदान केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेने आपली भूमिका बदलविली असून राज्यसभेत या विधेयकाला विरोध करणार असल्याचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com