Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकआदिवासी विद्यार्थ्यांची संगीत साधना; एकलव्य मॉडेल स्कुलचे संगीत प्रारंभिक परीक्षेत यश

आदिवासी विद्यार्थ्यांची संगीत साधना; एकलव्य मॉडेल स्कुलचे संगीत प्रारंभिक परीक्षेत यश

नाशिक । प्रतिनिधी

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शालेय अभ्यासक्रमा बरोबर कला क्षेत्रातही या विद्यार्थ्यांना प्राविण्य मिळविता यावे यासाठी आदिवासी विकास विभाग आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने पहिल्यांदाच संगीत विषयाचे ज्ञान देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम यंदाच्या शैक्षणिक सत्रात राबविण्यात आला आहे. पेठरोड येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथील ५५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत संगीताचे धडे गिरवून संगीत विषयाच्या प्रारंभिक परीक्षेत उत्तीर्ण होत शंभर टक्के यश प्राप्त केले आहे.

- Advertisement -

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रथमच संगीत या विषयातील शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमधील संगीत आणि गायनाचे सुप्त कलागुण बहरण्यासाठी या उपक्रमाचा मोठा हातभार लागला आहे. पेठरोड येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी संगीत कलेत मिळविलेले यश सर्व आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रेरणा देणारे आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सुरु झालेल्या उपक्रमाची पहिली संगीत परीक्षा म्हणजे गीत प्रथमा गेल्या महिन्यात झाली.

55 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. सुगम संगीत, मराठी, हिंदी गाणी, कविता वाचन या विषयांची परीक्षा यात घेतली गेली. विद्यार्थ्यांनी या मौखिक परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले. संगीत विशारद होण्या पर्यंतच्या सुगम संगीतातील सहा आणि शास्त्रीय संगीताच्या सात पायऱ्या या विद्यार्थ्यांना पुढील काळात पार करायच्या आहेत. श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्थ संचलित भारतीय सुगम संगीत महाविद्यापीठ, मुंबई येथील विद्या कुलकर्णी, संगीता उपासनी आणि वैशाली उपासनी या प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

परीक्षेतील यशानंतर यशस्वी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभाग आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांची भेट घेतली. आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाप्रती विशेष अभिनंदन करताना, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीत जोपासण्याचे स्वप्न साकार झाल्याचे उद्गार यावेळी आयुक्तांनी काढले. उपस्थित विद्यार्थ्यांनी आयुक्तांसमोर दोन शास्त्रीय संगीताची गाणी सादर केली. प्रारंभिक ते विशारद स्तरापर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना विस्तृत स्वरूपाचे मार्गदर्शन करण्याचा असा सल्ला यावेळी आयुक्त डॉ. कुलकर्णी यांनी प्रशिक्षकांना दिला. आयुक्तालयातील भेटीदरम्यान विकास पानसरे (एटीसी- मुख्यालय), अविनाश चव्हाण (उपायुक्त), लोमेश सलामे (उपायुक्त), मॉडेल स्कुलचे मुख्याध्यापक सुरेश देवरे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

आदिवासी विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे. मात्र , त्यांनी गीत प्रथमा परीक्षेत केलेली कामगिरी विशेष अभिनंदनीय आहे. सुरुवातीला असणारा भाषेचा अडसर बाजूला सारत मराठी गाणी आणि त्यातील भूपाळी या विद्यार्थ्यांच्या प्रथम प्रयत्नाच्या मानाने अगदी अचूक होती. 100 गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना संगीत, सूर, ताल, स्वर, गीत, गीतकार, संगीतकार, गायक म्हणजे कोण असे विविध प्रश्नांची मौखिक स्वरुपात परीक्षा घेण्यात आली होती अशी माहिती प्रशिक्षक विद्या कुलकर्णी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या