Friday, May 3, 2024
Homeनगरविद्यार्थी द्या..बदल्यात 10 हजार घ्या

विद्यार्थी द्या..बदल्यात 10 हजार घ्या

घारगाव |वार्ताहर|Ghargav

सध्या विविध कॉलेजेसमध्ये फार्मसी व इंजिनिअरिंग पदविका-पदवीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. काही शालेय संस्था विद्यार्थ्यांचा प्रवेश मिळविण्यासाठी सायबर कॅफे चालकांच्या संपर्कात आहेत. विद्यार्थ्यांचे कॉलेज निवडताना प्रथम आमच्या कॉलेजची निवड करा असे सांगून कॅफे चालकांना एका प्रवेशामागे 5 ते 10 हजारांचे कमिशन देत असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र यामध्ये पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. संगमनेर तालुक्यात असा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

- Advertisement -

व्यावसायिक क्षेत्रांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही गेल्या काही वर्षात संगणकाचा वापर वाढला आहे. विशेषतः विद्यापीठ आणि बोर्डात विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते विविध परीक्षांच्या निकालापर्यंत सर्वत्र संगणकाचा उपयोग होऊ लागला आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशासारख्या क्लिष्ट प्रवेश प्रक्रियेसाठीही त्याचा वापर यशस्वीपणे होऊ लागला आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात नसल्याने विद्यार्थी अज्ञान राहतात.

या अज्ञानाचा गैरफायदा घेत कॉलेज व सायबर कॅफे चालक आर्थिक हितसंबध जोपासत संबंधित कॉलेजचे नाव प्राधान्याने टाकले जाते आहे. विद्यार्थ्यांचे कॉलेजचे पसंतीक्रम सायबर चालक देत असल्याने त्यांना हवे असलेले कॉलेज मिळत नाही. दुसर्‍या व तिसर्‍या फेरीत नंबर लागेल की नाही या शंकेने एखाद्या मेरीट मधील विद्यार्थ्याला पण नको असलेल्या कॉलेजला प्रवेश घ्यावा लागतो आहे. तीनही फेरीत प्रवेश मिळाला नाही तर अधिकचे डोनेशन घेऊन व्यवस्थापकीय कोठ्यातून प्रवेश दिला जातो.

याबाबतीत विद्यार्थ्यांनी जागृत राहून फेरीमधील कॉलेज पसंतीक्रम देताना आपण सांगितल्याप्रमाणे दिला आहे कि नाही याची खात्री करणे गरजेचे आहे. प्रवेश फेरीची संपूर्ण माहिती घेऊनच विद्यार्थ्यांनी विश्वसनीय कॉलेज व सायबर कॅफेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात असतानाच त्यांना या प्रवेश प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मी पठार भागातील रहिवाशी आहे. मी गावातील एका सायबर कॅफेत प्रथम प्रवेश फेरीत पसंतीक्रम फॉर्म भरण्यासाठी गेलो असता कॅफे चालकाने मी सांगितलेले कॉलेज न घेता स्वतःच्या मर्जीतील कॉलेज घेतले. फॉर्म सबमिट केल्यानंतर मला नको असलेल्या कॉलेजचे नाव कळाले. आता मी दुसर्‍या फेरीसाठी अन्य सायबर कॅफेत जाऊन मला हवे असलेले कॉलेज निवडणार आहे.

– एक विद्यार्थी

- Advertisment -

ताज्या बातम्या