गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी वाचन कौशल्य प्राप्त करणे आवश्यक : प्रा. सुपे

0
गणोरे (वार्ताहर) – वाचन कौशल्य प्राप्त झाले की शिकण्याचा प्रवास सुलभ होतो. त्यामुळे शिक्षकांनी वाचन कौशल्य प्राप्त करण्यासाठी शास्त्रीयता जाणून अध्ययन अनुभवाची अनभूती दिली तर गुणवत्तेचा अपेक्षित आलेख उंचावता येईल असे प्रतिपादन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा.लक्ष्मण सुपे यांनी केले. ते राज्याच्या विद्या परीषदेच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील भाषा वाचन विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यशाळेचे उदघाटन करताना बोलत होते.
मुलांचे शिकणे प्रभावी करण्यासाठी जितके म्हणून अनुभव देता येतील अशा अनुभवांच्या माध्यमातून शिकणे होते. शिकताना जितके म्हणून ज्ञानेंद्रीयाचा वापर होईल तितके शिकणे आनंददायी होते. परीसर, मुलांची भाषा याचा विचार शिकविताना करण्याची गरज आहे. भाषेचे अध्यापन शास्त्र जाणून कृती होत गेल्यास मुलांचे शिकणे आनंददायी होईल. राज्याच्या वाचन विकास कार्यशाळेत विविध कृतींचा समावेश करण्यात आला आहे. त्या कृती मुलांच्या शिकण्याला मदत करणार्‍या आहेत. त्या कृती आणि त्या मागील कार्यकारण भाव जाणून शिकणे करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी राज्य सुलभक संदीप वाकचौरे यांनी प्रशिक्षणा मागील भूमिका विषद केली. राज्यात मराठी वाचनात मुले मागे पडत आहेत. ते मागे पडू नयेत व प्रत्येक मूल किमान पायाभूत स्वरूपाच्या वाचन क्षमतेपर्यंत पोहचावे याकरिता वाचन विकासाची प्रक्रीया गतीने व टप्प्याने घडावी याकरिता प्रयत्न करण्याची भूमिका यात ठेवण्यात आली. या कार्यशाळेतील कृतीचा वर्गकृतीत समावेश झाल्यास शिकण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. यावेळी सुलभक म्हणून मंगल पवार, नम्रता पवार, अऩिता पवार आदी उपस्थित होते. यावेळी े शिक्षक, केंद्रप्रमुख उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*