गडकरींची घोषणा रामबाण ठरेल का?

गडकरींची घोषणा रामबाण ठरेल का?

येत्या दोन वर्षात रस्त्यांवर टोल नाके नसतील. अत्याधुनिक पद्धतीने टोल वसुली करणारी यंत्रणा बसवण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. ही यंत्रणा वाहनांनी किती अंतर पार केले यांचे मोजदाद करील. त्यानुसार टोलची रक्कम यांत्रिक पद्धतीनेच वसूल केली जाईल.

टोलनाक्यांवरील रोख रकमेच्या देवाणघेवाणीचा व्यवहार थांबेल. या पद्धतीचा वापर सुरु होण्यास साधारण दोन वर्षे लागतील. त्यानंतर टोल भरण्यासाठी वाहनांना टोल नाक्यांवर थांबावे लागणार नाहीफ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीरपणे सांगितले आहे. गडकरींच्या या घोषणेचे वाहतूक जगतात स्वागतच होईल. विशेषतः ज्यांचा रस्ते वाहतुकीशी दिवसरात्र संबंध येतो त्यांना गडकरींचे आश्वासन दिलासा देणारे आहे. राज्यातील रस्त्यांवर जागोजागी टोल नाकी आहेत.

टोल वसुलीसोबतच वाहनांना तासनतास खोळंबा करण्याचे कर्तव्य टोलनाकी चोखपणे पार पाडत असतात. त्यांचा कारभार सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून गाजत असतो. वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि वैतागलेले वाहनचालक हेच बहुतेक टोल नाक्यावरील सध्याचे चित्र आहे. यामुळे वाहनचालकांचे तर खूपच नुकसान होते. कोंडीमुळे वेळापत्रक बिघडते. ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोचणे अवघड होते. इंधनाचे धुराडे होते. त्यामुळे इंधन खर्च वाढतो . वाहनचालकांमध्येच हमरातुमरीचे प्रसंगही ओढवतात. ही वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी यापूर्वी काही प्रयोग झाले.

महाराष्ट्र राज्य सरकारने एक समिती नेमली होती. देशात फास्ट टॅग प्रणाली लागू झाली. तथापि या प्रणालीमुळेही नाक्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. सर्वच वाहनचालकांकडे फास्ट टॅग नसणे, तो यंत्राने न स्वीकारणे, यंत्र हँग होणे, टॅग मध्ये पुरेसे पैसे नसणे अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी होतच असते. आता 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्ट टॅग बंधनकारक करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते टोलनाकेमुक्त करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारमधील बोलेल ते करणारा मंत्री अशी गडकरींची ओळख आहे. गडकरी जे बोलतात त्याचा ते कधीही इन्कार करत नाहीत.

जे आश्वासन देतात ते पूर्ण करतात असा लौकिक वाट्याला आलेले सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील गडकरी हे एकमेव मंत्री आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर टोलनाके नसतील आणि रस्ते वाहतूककोंडीमुक्त होतील अशी आशा वाहनचालकांच्या मनात निश्चितच निर्माण होईल. तथापि हे काम दोन वर्षात होईल असे गडकरी म्हणाले असले तरी सध्याची परिस्थिती विपरीत आहे. त्यामुळे टोलनाके रद्द होण्यास काही काळ पुढेमागे होण्याची शक्यता गृहीत धरावी लागेल. आगामी 4-5 महिन्यात काही राज्यांच्या विधानसभा निवडणूक होत आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अशी विधाने करतच असतात असाही एक पायंडा पडलेला आहे. तथापि गडकरींची आश्वासने असे कुठलेही अडथळे सहज पार करतात. त्यांच्या शब्दाला वजन आहे. ते त्यांच्या कार्यक्षमतेनेच टिकून आहे. म्हणून त्यांनी केलेली घोषणा सहसा लोंबकळत राहाणार नाही असा सर्वाना विश्वास वाटतो. त्यामुळेच वाहतूक कोंडी सोडवण्याच्या त्यांच्या घोषणेबद्दल ‘त्यांच्या तोंडात साखर पडो’ अशी प्रतिक्रीया वाहतूक कोंडीचा दीर्घकाळ अनुभव घेणारे वाहनचालक मोकळ्या मनाने व्यक्त करीत आहेत.

वाहनचालकांच्या या बोलक्या प्रतिक्रिया वाहन कोंडीची समस्या किती गंभीर आहे याची कल्पना देतात. ज्या दिवशी अविलंब टोल वसुली सुरु होईल त्या दिवशीच खरेतर चौपदरी महामार्गांचा मूलभूत उद्देश सफल झाल्याचे समाधान सर्व संबंधितांना मिळू शकेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com