जबाबदारी घ्यावी लागेल

जबाबदारी घ्यावी लागेल

१५ ते २५ वयोगटातील तरुणींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे. मार्च २०२३ मध्ये २२०० मुली बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे नोंद आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे चारशेने वाढले आहे. सरासरी रोज ७० मुली बेपत्ता होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. मुली जर अल्पवयीन असतील तर पोलिस बेपत्ता होण्याऐवजी अपहरणाची नोंद करतात. त्यामुळे अशांची स्वतंत्र नोंद पोलिसांच्या संकेतस्थळावर नसल्याचे सांगितले जाते. तरुण मुली बेपत्ता होणे ही गंभीर सामाजिक समस्या आहे. कोणतीही समस्या समूळ सोडवायची असेल तर तिच्या मुळाशी जायला हवे.  प्रेमप्रकरण व आमिषाला बळी पडून पळून जाणाऱ्या मुलींची संख्या अधिक असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. या समस्येचा बहुआयामी विचार केला जायला हवा.  मुली बेपत्ता कशा होतात? घर सोडून जाण्याची भावना का बळावते? पालक आणि मुलांमध्ये वाढत चाललेली दरी, समाजमाध्यमांवरील आभासी जगाची मोहिनी आणि स्वातंत्र्याच्या कल्पनेचा अतिरेक ही देखील त्याची काही कारणे असू शकतील का? मुली अचानक तर घर सोडून जात नसतील. ती भावना हळूहळू बळावत जात असेल. मुलींचे बदललेले वर्तन पालकांच्या लक्षात का येत नसावे? सध्याचे पालकही व्यस्त झाले आहेत. कुटुंबे छोटी झाली आहेत. आई-वडील दोघेही कमावते आणि घरी एकटी मुले हेच बहुसंख्य घरांमधील चित्र. एकट्या पडलेल्या मुलांना समाजमाध्यमांचे जग खुणावते. हळूहळू मुली त्याच्या आहारी कधी जातात हे त्यांनाही कळत नाही. समाजमाध्यमांवरील विषयांवर सध्या तरी कोणतेही बंधन नाही. कोणीही उठावे, स्वतःचे चॅनल काढावे आणि मजकूर टाकावा असे सध्याचे स्वरूप आहे. सगळेच चकाचक दाखवण्याचा सर्वांचा प्रयत्न आढळतो. चॅनल चालवणाऱ्यांचा खरा चेहरा समाजासमोर क्वचितच येतो. याच आभासी आणि मोहक जगाचे मुलींना आकर्षण वाटते. समाजमाध्यमांवर स्वप्नातील राजकुमार भेटेल याची जणू त्यांना खात्रीच पटते. पालकांची अनुपस्थिती आणि संवादाच्या अभावाची पोकळी आभासी जग भरून काढते. तथापि आभासी जगात आणि वास्तवात जमीनआसमानाइतके अंतर असते याकडे माध्यमतज्ञ वारंवार लक्ष वेधून घेतात. तथापि अडनिड्या वयातील मुलींना ते कसे कळावे? काळजीची भावना मुलींपर्यंत पोहचवण्यात अनेक पालकही कमी पडतात. पालकांची काळजी मुलींना पायातील बेडी किंवा स्वातंत्र्यावरचा घाला वाटू लागला तर नवल ते काय? आभासी जगाच्या नादी लागलेल्या मुलींचे बदललेले वर्तन किती पालकांच्या लक्षात येते?  तेवढा वेळ किती पालकांकडे असतो? या सगळ्याच्या मिळून परिपाक मुली पळून जाण्यात होत असावा का? याचा विचार पालक आणि समाजतज्ञांनाही करावा लागेल. समस्येमागची समग्र कारणे शोधावी लागतील. त्यावरच्या उपाययोजना सुचवाव्या लागतील. पालकांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी. बदलत्या काळात बदलत्या पालकत्वाचे भान पालकांनाही ठेवावे लागेल. समस्येचा दोष मुलींच्या माथ्यावर थोपवून कोणालाच हात झटकता येणार नाहीत. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com