योग्य बदल स्वीकारण्याच्या धाडसाला समाजाची साथ मिळतेच!

योग्य बदल स्वीकारण्याच्या धाडसाला
समाजाची साथ मिळतेच!

भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ‘बदल घडावा' असे प्रत्येकालाच वाटते. पण बदलाची सुरुवात आपणच करावी असे मात्र कोणालाच वाटत नाही. मनुष्य तेव्हाच बदलू शकतो, जेव्हा तो आपल्यातील दुर्गुणांचा नाश करतो’. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने भगवान बुद्धांचा हा उपदेश अंमलात आणला. गावातील विधवा प्रथा बंद करायचा निर्णय घेण्याचे धाडस केले व तो निर्णय हिंमतीने कृतीतही आणला. त्याचे माध्यमांनी सुद्धा भरपूर कौतूक केले. हेरवाड गावातीलच एका घरातील व्यक्तीचे निधन झाले. ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगितले. त्यांनीही या बदलाला साथ दिली. हेरवाड ग्रामपंचायतीने बदलाची पणती पेटवली आणि बघता बघता त्या पणतीने बदलाचा मार्ग प्रकाशमान केला. चुकीची प्रथा नाकारण्याची हिंमत त्यामुळे अनेकांनी दाखवली. नाशिकमधील सुगंधाबाई चांदगुडे यांच्या पतीचे 13 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यांनाही इतक्या वर्षांनी विधवा प्रथा नाकारण्याचे बळ मिळाले. नुकतेच त्यांनी पुन्हा एकदा पायात जोडवे घातले. कपाळावर लाल टिकली लावली आणि मंगळसुत्र घातले. ‘या कुप्रथांमुळे खुप त्रास होत होता. मला समाजाकडून कायमच दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती. पण मी व माझा मुलगा कृष्णाने ते दुष्टचक्र कायमचे संपवले आहे. मी विधवा प्रथेचा त्याग केला आहे’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना माध्यमांकडे व्यक्त केल्या. कोल्हापूरमधील शुभांगी थोरात यांनीही विधवा प्रथा पाळल्या नाही आणि त्यांच्या आईलाही पाळू दिल्या नाहीत. त्यांनी हा बदल हेरवाड ग्रामपंचायतीच्याही आधी घडवून आणला होता. सन्मान देणार असाल आणि हळदकुंकू लावणार असाल तरच मला सार्वजनिक सण-समारंभांना बोलवावे असा आग्रह त्या सातत्याने धरत राहिल्या. त्यांच्यामुळेच त्यांच्या आईलाही विधवा प्रथा झुगारण्याचे बळ मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील प्रमोद झिंजाडे या वयाने ज्येष्ठ व्यक्तीने तर याही पुढचे पाऊल टाकले. आपल्या मृत्यूनंतर पत्नीने कोणत्याही प्रथा पाळू नयेत आणि त्या पाळण्याची सक्ती कोणीही करु नये अशा आशयाचे प्रतिज्ञापत्रच त्यांनी नोंदवले आहे. त्यांच्याशी आता अनेक जण संपर्क साधत आहेत आणि असे प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी मार्गदर्शन मागितले जात आहे. राज्य सरकारनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हेरवाड ग्रामपंचायतीचे अनुकरण आणि विधवा प्रथा बंद करावी असे आवाहन करणारे परिपत्रक काढले आहे. उपरोक्त सर्वांनी समाजाला योग्य दिशा दाखवली आहे. समाजाला योग्य पद्धतीने, समजेल, उमजेल आणि पचेल अशा पद्धतीने दिशा दाखवली गेली तर लोक बदल सहज स्वीकातात. स्वत:त तर बदल घडवून आणतातच. पण इतरांनाही बदलासाठी प्रेरणा देतात. हे वरील उदाहरणांवरुन लक्षात येते. समाजात अशा अनेक अनिष्ठ रुढी आणि परंपरा रुढ आहेत. त्यांना कायमची तिलांजली द्यायला हवी. अशा रुढी नाकारण्याचे बळ हेरवाडच्या उदाहरणातून लोकांना मिळेल. अर्थात, समाज विशाल आहे. रुढी आणि परंपरांच्या बाबतीत ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असाच अनुभव येतो. त्यामुळे अशा बदलांचे परिणाम दिसायला काही काळ जावाच लागतो. पण त्याची सुरुवात झाली आहे हे मात्र निश्चित. समाजाचा विचार करु पाहाणार्‍या प्रत्येकाने समाजाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला तर समाजाकडून त्याला साथ मिळते हे यावरुन अधोरेखित झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com