अशक्य ते शक्य करता सायास...

अशक्य ते शक्य करता सायास...

समाजातील काही मुद्यांवर विचारवंतांना, सामाजिक कार्यकर्त्यांना नेहमीच बोलावे लागते. ते मुद्दे धसास लावण्याचे आव्हान अजून किती दिवस पेलावे लागणार आहे हे कदाचित काळ देखील सांगू शकणार नाही. महिलांशी संबंधित मासिक पाळी हा त्यातीलच एक मुद्दा! मासिक पाळीचे चक्र प्रजननक्षमतेसंदर्भात महत्वाचे मानले जाते. हे चक्र महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी निगडित आहे. तथापि दुर्दैवाने याचविषयी समाजावर कालबाह्य रूढी आणि परंपरांचा पगडा आढळतो. त्यांचा विळखा सैल करणे माउंट एव्हरेस्ट चढण्यापेक्षाही कठीण आहे, अशा भावना संगीता रोकाया हिने माध्यमांकडे व्यक्त केल्या आहेत. ती नेपाळची आहे.

तिने नुकतेच माउंट एव्हरेस्ट सर केले. नेपाळमध्ये मासिक पाळीदरम्यान छाउपडी प्रथा पाळली जाते. म्हणजे मासिक पाळीच्या दिवसात त्या महिलेला गावाबाहेर एका झोपडीत राहावे लागते. या प्रथेविरोधात जनजागृती करण्यासाठी संगीताने एव्हरेस्टवर यशस्वी स्वारी केली. आपण या प्रथेचा वेदनादायी अनुभव घेतला असल्याचे तिने सांगितले. मासिक पाळीदरम्यान महिलांना तात्पुरते सामाजिक बहिष्कृत करणे फक्त नेपाळपुरते मर्यादित नाही. प्रथेची नावे वेगळी असतील कदाचित पण ती महाराष्ट्रात देखील काही गावांमध्ये पाळली जाते. अशी प्रथा पाळणारी काहीच गावे असतील कदाचित पण अनेक घरे ती प्रथा त्यांच्याही कळत-नकळत पाळतात. अनेक महिलांना मासिक पाळीच्या चार दिवस त्यांच्याच घरात वेगळे राहावे लागते. अनेक महिलांसाठी हे चक्र त्रासदायक ठरू शकते. त्यांना वेदना होऊ शकतात. काहींचे मानसिक आरोग्य अस्वस्थ असू शकते. याची जाणीव किती जणांना होत असावी? तीच होत नसेल तर प्रथा कालबाह्य ठरते हे कसे लक्षात येऊ शकेल? ते काम संगीता रोकायासारख्या सक्षम महिलेला देखील अवघड का वाटते? त्याचा दोष महिलांकडे पण येतो, असे म्हणणे वावगे ठरू नये. ज्ञान तुमच्या विचारांच्या कक्षा रुंदावते. दृष्टिकोन विशाल करते. मासिक पाळीविषयी ज्ञान प्राप्त झाले तर महिला विचार करू शकतील. त्यांच्या आयुष्यातील मासिक पाळीचे महत्व त्यांना समजेल. मासिक पाळीशी संबंधित रूढींमधील तथ्यहीनता त्यांच्याच लक्षात येईल. रूढींचा पगडा झुगारण्याची भीती कदाचित कमी होऊ शकेल. जनजागृती करणाऱ्यांच्या मागे उभ्या राहू शकतील. तेवढे धाडस कदाचीत नाही दाखवू शकल्या तरी किमान त्यांच्या घरापुरती ती प्रथा निकाली काढण्याचा विचार तरी त्या करू शकतील. तथापि या चक्राविषयी किती महिलांना शास्त्रीय माहिती करून घेण्यात रस असतो? ही सामाजिक समस्या धसास लावण्यासाठी अनेक सामाजिक संस्था स्वयंस्फूर्त काम करतात. त्यांना साथ देण्यासाठी महिलांना देखील पुढे यावे लागेल. ज्ञान प्राप्त करावे लागेल. तज्ञांकडून माहिती करून घ्यावी लागेल. कारण मासिक पाळीशी संबंधित काही त्रास असेल तर तो आणि कालबाह्य रूढींचा काच महिलांनाच सहन करावा लागतो. त्याचीही पायवाट समाजसुधारक, संत आणि शिक्षणप्रसारकांनी आखून दिली आहे. समाजातील अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी-परंपरा आणि भेदाभेदांचा पगडा सैल व्हावा यासाठी समाजसुधारक, शिक्षणप्रसारक आणि संतांनी त्यांचे आयुष्य वेचले. 'अशक्य ते शक्य करता सायास... तुका म्हणे' यातील मर्म समाजाने लक्षात घ्यायला हवे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com