Saturday, April 27, 2024
Homeअग्रलेखसुरक्षित पर्यटनासाठीचे शहाणपण येईल का?

सुरक्षित पर्यटनासाठीचे शहाणपण येईल का?

पावसाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी छोटे-मोठे धबधबे वाहात आहेत. पावसाच्या आणि निसर्गाच्या अतूट नात्याचे वर्णन कवी आणि साहित्यिक करतात. ‘वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे’ असे दामोदर अच्युत कारे म्हणतात. तेच नाते पर्यटकांना खुणावू लागले आहे. पर्यटनाचा उत्साह समजण्यासारखा आहे. तथापि काही लोकांचा अती उत्साह मात्र त्यांच्या जीवावर बेतू लागला असून समाजाची डोकेदुखी ठरत आहे. कवितेचा भावार्थ मनवेधक आहे. पण पर्यटक मात्र खरोखरच स्वैर उधळताना आढळतात.

लोहगडावर नुकतेच हजारो पर्यटक काही तास अडकून पडले होते. माध्यमात प्रसिद्ध झालेली तिथली छायाचित्रे अंगावर काटा आणणारी आहेत. एरवी रस्त्यांवर वाहतूक जाम होते. तथापि त्या किल्याच्या वाटेवर वाहतूक जाम झाली होती. गडावर, वाटांवर पाय ठेवायला जागा नव्हती. एकमेकांशी समन्वय साधून खाली उतरलो, असे अडकलेल्या काही पर्यटकांनी माध्यमांना सांगितले. असा अनुभव अनेक पर्यटनस्थळांवर येतो. हरिहरगडावर देखील अनेकदा असे घडले आहे. अनेकदा दुर्घटना घडतात. काहींना जीव गमवावा लागतो. त्याचा ठपका काही प्रमाणात सरकारवर देखील ठेवला जातो. ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला’ असेच सरकारला वाटत असावे. रायगड जिल्हा प्रशासनाने देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाटातील वर्षा सहलींवर बंदी घातली आहे. हरिहर गडावर जाण्यासाठी वनखात्याची परवानगी बंधनकारक आहे. काजवा महोत्सव बंद करावेत अशी मागणी त्या परिसरातील ग्रामस्थ का करतात? पर्यटन पूरक रोजगार निर्मिती करते. पर्यटनस्थळांच्या परिसरात शेकडो लोकांच्या हाताला तात्पुरते का होईना पण हाताला काम मिळते. तरीही बंदी घालण्याची वेळ प्रशासनावर का येत असावी? पर्यटकांचा अती उत्साह तर एक कारण आहेच. अनेक ठिकाणी प्रशासन नियमांचे फलक लावते. किती पर्यटक ते वाचतात. नियम हरताळ फासण्यासाठीच असतात असा भ्रम लोकांचा झाला असावा. पर्यटकही त्याला अपवाद नाहीत. कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले नसताना गडाच्या कड्यांवर, समुद्रकिनारी अती धाडस करतात. ते जीव धोक्यात घालतात. रिल्स करतात. गर्दी करतात. त्यातूनच दुर्दैवी घटना घडतात. त्याचे एक कारण पर्यटनस्थळी पुरेशा सुविधा नसणे हे देखील असावे. हौशी पर्यटक अनेक अनवट वाटा शोधून काढतात. तिथे जाणाऱ्यांची संख्या वाढते. त्या प्रमाणात सुविधा निर्माण होतात का? पर्यटकांना सूचना देणारे फलक लावलेले असतात. तथापि सुरक्षित ठिकाणे निर्माण करणे, मदत व बचाव पथके सज्ज ठेवणे, चेंगराचेंगरी होऊ नये याचे नियोजन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. गडांवर एकावेळी, एका दिवशी किती पर्यटकांसाठी प्रवेश मर्यादा निश्चित करता येऊ शकेल का? पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांमध्ये संवाद आणि समन्वय राखला जाऊ शकेल का? कारण यातून निर्माण होणाऱ्या रोजगार संधींकडे दुलर्क्ष करणे परवडणारे नाही. पर्यटन केल्याने माणसाला शहाणपण येते असे समर्थ रामदास स्वामी यांनी म्हंटले आहे. सुरक्षित पर्यटन करण्याइतके शहाणपण तरी येईल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या