शिक्षणक्रमातील साचलेपणाची अवस्था बदलणार का?

शिक्षणक्रमातील साचलेपणाची अवस्था बदलणार का?

राज्यातील शाळा ऑनलाईन सुरु आहेत. काही शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्या आहेत. मुलांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबत पालकांमध्ये मते आणि मतांतरे आढळतात. विशेषतः करोना काळानंतर आता शहरी भागातील अनेक पालक मुलांना शाळेत पाठवण्यास नाखूष असल्याचे आढळते. तुलनेने ग्रामीण भागातील पालक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास फारसे अनमान करत नाहीत.

गेले पंधरा-सोळा महिने मुले घरी आहेत. शाळेत गेल्यावर वर्गानुसार मुलांच्या अनेक क्षमतांचा विकास होण्याची संधी असते. चित्रांच्या साहाय्याने शाळेत गोष्टी सांगितल्या जातात. योग्य उच्चारांसह गाण्याच्या माध्यमाने कशी गोष्टी शिकणे सोपे होते असेही सांगितले जाते. मुलांचा शब्दसंग्रह वाढण्यास मदत होते. लेखन आणि वाचन मुलांची ज्ञानलालसा वाढवते. तथापि सध्या तरी असे घडतांना का आढळत नाही? कदाचित त्यामुळेच शाळा सुरु असल्या तरी शिकणे फक्त पुस्तकी ज्ञानापुरते एकसुरी झाले आहे. कारण पुस्तकी अभ्यासक्रम म्हणजेच पूर्ण शिक्षण हा समज का बळावला असेल? ही वस्तुस्थिती आहे का?

या ठिकाणी सर्वोदय चळवळीचे गांधीवादी संत विनोबाजी भावे यांनी शिक्षणाबद्दल शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘आचार्य कुल’ ही संस्था सुरु केली होती, त्याची आठवण येते. त्या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षणाबद्दल मार्मिक विचार विनोबाजींनी व्यक्त केले होते. ‘बालकांना शाळेत आपण काही शिकवतो ही कल्पना शिक्षकांनी बाजूला ठेवावी. प्रत्येक बालक आपल्या सोबत विशिष्ट संस्कारांची शिदोरी घेऊन जन्माला येते. अशी बालके म्हणजे फुलांचे ताटवे होत. त्या ताटव्यांची वाढ योग्य प्रकारे व्हावी. त्यांना वाढीला पूरक वातावरण मिळावे. वेळच्या वेळी निगा राखली जावी. त्याप्रमाणे बालकांच्या ग्रहणशक्तीचे योग्य प्रकारे पोषण होईल याची काळजी शिक्षकाने घ्यायची असते.

एकप्रकारे शिक्षकाची ही भूमिका बागकाम करणार्‍या माळ्याची आहे हे शिक्षकाने लक्षात ठेवावे. माळ्याने कितीही प्रयत्न केला तरी गुलाबाच्या फुलाला मोगर्‍याचा सुवास आणता येणार नाही. किंवा मोगर्‍याला गुलाबाचा रंग माळी देऊ शकत नाही. रंग, गंध, सुगंध वेगवेगळे आकार हे प्रत्येक फुलाचे मूलभूत गुणधर्म वा संस्कार आहेत. त्यांचा अधिक चांगल्या प्रकारे विकास होईल एवढेच माळ्याने करावयाचे असते. शिक्षकाने काम तद्वतच आहे. प्रत्येक बालकाची गुणवैशिष्ये लक्षात घेऊन त्याच्या विकासाकडे शिक्षकाने लक्ष दिले पाहिजे’. हा विनोबाजींनी मांडलेला मूलभूत विचार आजच्या किती शिक्षकांना माहित असेल? साहजिकच आजच्या शिक्षण पद्धतीत पुस्तकी अभ्यासक्रमावर भर दिला जातो.

तो मुलांच्या सर्वागीण विकासाला किती पोषक ठरणार? या मूलभूत कल्पनेला थोडाफार वाव देणारे काही चांगले कार्यक्रम हल्ली दूरचित्रवाणीच्या पडद्यावर बघायला मिळतात. पाच सात वर्षांपासून पंधरा वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन बालकांना त्यांच्या कलागुणांचे दर्शन घडवण्याची संधी दूरचित्रवाणीच्या अनेक कार्यक्रमातून मिळते. जमलेल्या श्रोत्यांकडून त्यांची प्रशंसा होते. त्याचा प्रभाव बालकाच्या सर्वांगीण विकासाला मदत करतो. याचीच पुढची पायरी काही विदेशातील बालकांचे विक्रम वाचल्यावर येते. भारतीय वंशाच्या 11 ते 15 वर्षांच्या बालकांची विशेष बौद्धीक प्रगती लक्षात घेऊन त्यांना अमेरिकन व्यावसायिक कंपन्यात मोठमोठ्या हुद्यावर कामाची संधी दिली जाते. बातम्या वाचूनच आपली सर्वांची छाती फुगते.

वयाच्या विशीत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिणार्‍या ज्ञानेश्वरांचे कौतूक मंडळी पिढ्यानपिढ्या करत आहेत. तरीही आमच्या शिक्षणपद्धतीत असे आधुनिक ज्ञानेश्वर का निर्माण होत नसावेत? याचा विचार भारतीय शिक्षणतज्ञ सुद्धा करतच असतील. पण शिक्षणात अशा उदाहरणांचा समावेश कितीसा आढळतो? तशी जिज्ञासा निर्माण होण्याची संधी मुलांना शाळेत मिळू शकली तर केवळ अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय बालकांना मिळणारी संधी या देशातही उपलब्ध व्हावी; त्या दृष्टीने बालकांच्या विकासाला पोषक ठरावेत म्हणून केले जाणारे कायदे व त्यातील वयोमर्यादेची बंधने सुद्धा शिथिल करावी लागतील का? अशा अनेक बाजुंनी विचार करून शिक्षणाचे धोरण आणि प्रचलित स्वरुप आमूलाग्र बदलण्याचा विचार आवश्यक आहे का? मात्र सध्याच्या सरकारी कामकाजाच्या रूढ झालेल्या पद्धतीत असा मूलभूत विचार करण्याची क्षमता दाखवणे देखील एक साहसपूर्ण पाऊल ठरेल! सरकारी शिक्षण खात्याच्या चाकोरीबद्ध अधिकारी पद्धतीला सरावलेले अधिकारी व राज्यातील विद्यापीठांत कार्यरत असणारे अनुभवसंपन्न शिक्षणतज्ज्ञ आदी संबंधीतांकडून बालकांच्या विकासोन्मुख आमूलाग्र बदलांची अपेक्षा करावी का?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com