स्त्रियांना सन्मानाचे जीवन समाज मिळवून देईल?

स्त्रियांना सन्मानाचे जीवन समाज मिळवून देईल?

जपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरूवात होत आहे. नऊ दिवसांच्या या मंगलकाळात आदिशक्तीचा जागर केला जाईल. तिची आराधना करून सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद मागितला जाईल. स्त्रियांना प्रोत्साहन आणि आत्मबळ देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असायला हवा. नवरात्रोत्सवात चराचरात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते. आदिशक्ती देवी भगवतीचा सभोवार वास असल्याची भावना भाविक-भक्तांमध्ये निर्माण होते.

आदिशक्तीच्या पूजनासाठी सर्व जण नवरात्रोत्सवाची वाट पाहत असतात, पण मुलगी, पत्नी, आई, बहीण आदी विविध रुपांनी आदिशक्ती घरोघरी सदैव नांदत प्रत्येक कुटुंबाची काळजी घेत असते. कुटुंबाच्या भरभराटीसाठी काबाडकष्ट करीत असते. कुटुंबाच्या उत्पन्नात यथाशक्ती भर घालत असते. मात्र त्याची जाणीव कुटुंबांतील पुरुषमंडळींना किती असते? महिलांना प्रगती करण्यासाठी, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सरकारी, सामाजिक आणि कौटुंबिक पातळ्यांवर आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहेत. असे प्रयत्न करण्याबाबत समाज जागृत झाला आहे. समाजातील हा बदल सकारात्मक आहे. मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन कितीतरी मुली आणि महिला जीवनात यशस्वी होत आहेत.

आपल्या कर्तबगारीचा परिचय कुटुंबाला आणि समाजाला करून देत आहेत. काळानुरूप कुटुंबव्यवस्था सुजाण होत आहे. मुला-मुलींमधील भेदाला फाटा देऊन दोघांना बरोबरीने वागवण्याला प्राधान्य देत आहे. त्यातून महिला सबलीकरणाला हातभार लागत आहे. शिक्षण, उद्योग, राजकारण, समाजकारण, संरक्षण, कायदा-सुव्यवस्था आदी सर्वच क्षेत्रे स्त्रियांनी पादाक्रांत केली आहेत. स्त्रियांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला नाही, असे एकही क्षेत्र आता उरलेले नाही. पुरुषांपेक्षा त्या कुठेही उण्या नाहीत.

ही उजळ बाजू नेहमीच सर्वांपुढे येते, पण स्त्री-जीवनाबाबतचे हे अर्धसत्य आहे. दुसरी बाजू अंधारलेली आहे. ती क्वचितच उजेडात येते. आजदेखील समाजात कितीतरी स्त्रियांना कौटुंबिंक छळास, अत्याचारास सामोरे जावे लागते. पुरोगामी समाजाच्या पांढर्‍या स्वच्छ पेहरावावरचा हा काळाकुट्ट डाग म्हटला पाहिजे. स्त्रियांच्या छळाला अशिक्षित वा सुशिक्षित असा नियम लागू होत नाही. दोन्ही पातळ्यांवर तो सुरू असतो. घरांमध्ये अन्याय-अत्याचार होत असताना बाहेरच्या जगातही स्त्रिया सुरक्षित नाहीत. एकट्या-दुकट्या, असहाय्य स्त्रियांना गाठून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचे प्रकार अलीकडे  वाढीस लागले आहेत. पैशांसाठी पोटच्या मुलींची विक्री करणारे आईबापसुद्धा आजच्या समाजात आढळतात. घरी आणि दारी अशा दोन्ही ठिकाणी स्त्रिया अत्याचारांची शिकार होत आहेत.

आजचा समाज सुशिक्षित आणि विचारी झाल्याचे मानले जाते, पण एखाद्या स्त्रीवर समाजकंटकांकडून अन्याय-अत्याचार होत असेल तर त्या स्त्रीच्या मदतीला जाण्याऐवजी ‘मला काय त्याचे’ अशी कातडीबचाव भूमिका घेणारी माणसे असलेला समाज स्त्रियांना आत्मसन्मान कसा काय मिळवून देणार? आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा गैरवापर वाढला आहे. समाज माध्यमांचा वापर करून मुली आणि स्त्रियांना लज्जित, अपमानित करण्याचे व त्यांचे चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न वाढले आहेत.

महिला संरक्षणासाठी कायदे आहेत, पण नुसते कायदे असून उपयोग नाही. जागरूक समाज असणे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. देशाच्या अनेक भागांत महिलांवरील अत्याचारांच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रासारखे पुढारलेले राज्यसुद्धा त्याला अपवाद नसावे हे दुर्दैव! स्त्रियांना संरक्षण देण्यात कमी पडणार्‍या पुरोगामी महाराष्ट्राचे मागासलेपण अशा घटनांमधून अधोरेखित होत आहे.

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेतेमंडळी सध्या फक्त सत्ता आणि राजकारणात मश्गूल आहेत. सामाजिक प्रश्‍नांकडे लक्ष पुरवायला त्यांना सवड नाही. त्याचाच फायदा समाजातील अपप्रवृत्ती उठवत आहेत. महाराष्ट्रातील लेकीबाळींना निर्भय जीवन जगण्याइतके सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आजपासून सुरू होणार्‍या नवरात्रोत्सवानिमित्त नेतेमंडळी करतील का? स्त्रीशक्तीकडून मिळणारा आशीर्वाद हा आदिशक्तीचाच आशीर्वाद असेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com