बेपर्वा आणि बेफिकिर वृत्तीचेही विसर्जन कधीतरी केले जाईल का?

बेपर्वा आणि बेफिकिर वृत्तीचेही विसर्जन कधीतरी  केले जाईल का?

आज अनंत चतुर्दशी! गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. दहा दिवसांसाठी घरोघरी पाहुणा म्हणून आलेल्या मालकाचे आज विर्सजन होईल. या लाडक्या पाहुण्याचे लोकांनी आणि सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. करोनामुळे सर्वच सार्वजनिक सण दोन वर्षे साजरे झाले नव्हते. गणेशोत्सवात लोकांनी त्याची सव्याज भरपाई केली.

ढोल ताशांचा गजर, सकाळ संध्याकाळ घुमणारे सार्वजनिक आरतीचे स्वर , मंडपांमध्ये वाजणारी गणपतीची गाणी आणि भजने याने दहा दिवस वातावरण दुमदुमले होते. उत्सवाचे शेवटचे दोन-तीन दिवस गणेशोत्सवातील देखावे बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी केली होती. आजच्या गणेश विसर्जनावर पावसाचे सावट आहे.

नाशिकसह काही जिल्ह्यांना हवामानखात्याने पावसाचे पिवळे फर्मान (यलो अ‍ॅलर्ट) जारी केला आहे. उत्सवाच्या दहा दिवसातही पाऊस अधुनमधून हजेरी लावतच होता. तथापि भक्तांचा उत्साह जराही उणावलेला नाही. कालपर्यंत सगळीकडे विसर्जनाची जोरदार तयारी सुरु होती. भर पावसात निघणार्‍या मिरवणुकीची मजा औरच असते अशीच सार्वत्रिक प्रतिक्रिया होती. पोलीस आणि प्रशासनही विसर्जन सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

सार्वजनिक मिरवणूक मार्गावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी सामाजिक संस्थांनी कंबर कसली आहे. गणेशमुर्तींचे विसर्जन केले जाते अशा सर्व ठिकाणी संस्थांचे कार्यकर्ते असतील. ते कार्यकर्ते निर्माल्य आणि लोकांनी स्वेच्छेने दान केलेल्या गणेशमुर्तींचे संकलन करणार आहेत. लोकांनी मुर्ती गोदावरीत विसर्जन करु नये. त्या दान कराव्यात असे आवाहन अनेक संस्थांनी केले आहे. पोलीसांनी देखील विसर्जन मिरवणुकीची आचारसंहिता जारी केली आहे. मिरवणूक शांततेत पार पडावी या उद्देशाने सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक देखील घेतली आहे.

या सज्जतेला लोक कसा प्रतिसाद देतील ते आज कळेल. पण सर्वसाधारणपणे सार्वजनिक सण आणि समारंभांकरता जारी केलेल्या आचारसंहिता लोक फारशा गंभीरपणे घेत नाहीत असा आजवरचा यंत्रणेचा अनुभव आहे. कोणतेही नियम आणि कायदे पाळण्यासाठी नसतात असा समज दृढ झाला आहे. त्याला सार्वजनिक सणांकरता जारी करण्यात येणारी आजारसंहिताही अपवाद नाही. त्यामुळे यंत्रणा काहीही म्हणो, आपली चाकोरी मोडायची नाही असाच दृष्टीकोन आढळतो. त्यामुळेच विसर्जन मिरवणूक वेळेत निघून वेळेत संपावी असा आग्रह विविध यंत्रणांनी धरला असला तरी तसेच घडेल का हे आज कळेल.

लोकशिक्षणाचा मुद्दा फक्त विसर्जन मिरवणुकीपुरता मर्यादित नाही. अन्य बाबतीतही अनेकदा तोच अनुभव सार्वत्रिक असतो. रस्ते अपघातांसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच त्याच मुद्याची री ओढली आहे. वाहन अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी नियम अधिक कठोर केले जातील पण लोकांच्या सहकार्याशिवाय रस्त्यांवरचे अपघात कमी होणे शक्य नाही असे त्यांनीही म्हटले आहे. गडकरींनी त्यांच्या खात्याशी संबंधित विषयापुरते मर्यादित भाष्य केले आहे. तथापि याचा अर्थ इतर क्षेत्रांमध्ये परिस्थिती यापेक्षा वेगळी नसावी. सध्या साथीच्या रोगांचा फैलाव सुरु आहे. पाणी साठवून ठेवू नका. घराच्या आजुबाजुला अस्वच्छता नको. अडगळ ठेऊ नका असे आवाहन वारंवार केले जात आहे. किती लोक ते मनावर घेतात? नाशिक जिल्ह्यातील शेकडो शासकीय कार्यालय परिसरात डेंग्यूच्या प्रसाराला पोषक वातावरण असल्याचे माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. साथीच्या रोग प्रसाराचे श्रेय सरकारी कार्यालयांनाच दिले जावे अशी वस्तुस्थिती स्पष्ट करणार्‍या बातम्याही झळकल्या आहेत. अशी अनेक अंगांनी समाजाला नियमभंगाची दुखणी जडली आहेत.

ज्यांच्यावर ती दुखणी शोधायची जबाबदारी आहे तीच मंडळी याबाबतीत पुरेशी बेफिकिर आहेत. किंबहुना त्या नियमभंगातून आणखी काय मिळवता येते याचाही अभ्यास कसोशीने सुरु असतो. एकुणच समाज कधी सुधारणार का हा कळीचा प्रश्न आहे. आज उत्सवी गणेशमुर्तींच्या विसर्जनाबरोबरच बेपर्वा आणि बेफिकीर वृत्तीचेही विसर्जन लोक करतील का? अर्थात त्याबद्दल लोकांना योग्य मार्गदर्शन होईल असा आदर्श सर्व शासकीय यंत्रणांकडून जनतेपुढे उभा केला जाईल का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com