अंमलबजावणीवाचून प्लास्टिक बंदी पुन्हा कागदावरच राहाणार का?

अंमलबजावणीवाचून प्लास्टिक बंदी पुन्हा कागदावरच राहाणार का?

आधुनिक जगात मानवजातीचे जीवन सुखकारक व्हावे यादृष्टीने विविध क्षेत्रात नवनवे संशोधन सुरु असते. त्यातून नवनवे शोधही लागतात. मात्र त्यापैकी काही शोध प्रारंभी उपकारक वाटले तरी काळ जातो तसतशा त्यातील प्रतिकुल उणीवा स्पष्ट होऊ लागतात. गेल्या सात आठ दशकांपूर्वी लागलेला प्लास्टिकचा शोध, बेसुमार वेगाने त्याचा वाढलेला वापर, हा देखील मानवजातीच्या अस्तित्वालाच आव्हान देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळेच प्लास्टिकचा वापर नियंत्रित करण्याबाबतचे उपाय सरकारकडून योजले जात आहेत. प्लास्टिकचा वापर नियंत्रित करण्याच प्रयत्न म्हणून सरकारने बंदीचा उपाय अवलंबला आहे. त्यालाही काही वर्षे लोटली. पण अपेक्षेच्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर कमी झाला नाही. म्हणून कालच एका नव्या कठोर आदेशाचा अवलंब कायद्याने सुरु झाला आहे. ‘एकदा वापरा व फेका (सिंगल यूज)’ अशा प्रकारच्या प्लास्टिकचा वापर सर्वस्वी बंद करणारा कायदा भारतात लागू झाला आहे.
त्यासाठी 19 वस्तुंची यादी सरकारने जाहीर केली आहे. ही बंदी मोडणाराला 7 वर्षे कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. फक्त पृथ्वीवरचे नव्हे तर पशूपक्षी, प्राणीजगत आणि सर्व मानवजातीच्या अस्तित्वालाच एक-वापर प्लास्टिकमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. पाळीव प्राण्यांबरोबरच वन्यप्राण्यांच्या पोटातही मानवनिर्मित प्लास्टिकचा कचरा आढळू लागला आहे. उत्तराखंडमध्ये या विषयावर संशोधन सुरु आहे. हत्ती आणि हरणासारख्या शाकाहारी प्राण्यांच्या विष्ठेत प्लास्टिकचे नमुने सापडलेले पाहाणे खूप भयंकर होते अशी प्रतिक्रिया तेथील एका संशोधकाने माध्यमांकडे व्यक्त केली. सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणार्‍या जगातील दहा देशात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. समुद्राच्या तळाशी प्लास्टिकचे मोठमोठे डोंगर निर्माण होत चालले आहेत याकडे पर्यावरण तज्ञ सातत्याने लक्ष वेधत आहेत. समुद्राला आलेल्या भरतीच्या लाटांनी समुद्राच्या पोटातून तब्बल दीडशे टनांपेक्षा जास्त कचरा मुंबईच्या किनार्‍यावर आणून टाकल्याची घटना नुकतीच घडली. रस्त्यावर फेकून दिले जाणारे प्लास्टिक गटारींमध्ये अडकते आणि गटारी तुंबतात. नदीमध्ये फेकलेल्या प्लास्टिक कचर्‍यामुळे पाण्याचे प्रदुषण होते. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अन्नपदार्थ भरुन पिशवीचे तोंड बंद करुन फेकले जातात. ते खाण्याच्या नादात ते प्लास्टिकही भटक्या जनावरांच्या पोटात जाते. तात्पर्य एक-वापर प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय यथायोग्यच आहे. तथापि त्याच्या अंमलबजावणीबद्दल मात्र खात्री देता येईल का? बंदी घालून काही अनिष्ठ गोष्टी थांबवण्याचा पर्याय सहसा पुरेशा अंमलबजावणीअभावी अपयशी ठरतो असे आजवरचे अनेक अनुभव शासनाच्या दप्तरी दाखल असतील. लोकांनाही ते प्रत्यही आठवतात. एकदा वापरुन फेकल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तू लोकप्रिय का आहेत? आणि त्यांना पर्याय निर्माण करता येईल का? एखादी गोष्ट वापरु नये असे बंधन परिणामकारक ठरण्यासाठी त्या वस्तूला पर्याय द्यावा लागतो हे सरकारी तज्ञांना ठाऊकच असेलच. प्लास्टिक वापरावर बंदी यशस्वी ठरायची असेल तर प्रभावी लोकशिक्षणाच्या मोहिमेची जोड द्यावी लागेल. एक-वापर प्लास्टिकवरील बंदीचा कायदा करुन काही वर्षे उलटली आहेत. तथापि पुरेशा अंमलबजावणीअभावी त्या कायद्याचा प्रभाव आजवर तरी क्वचितच आढळतो. तसेच या नव्या आदेशाचे होणार नाही याबाबत सरकार काय दक्षता घेणार?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com