कारणे शोधून अपघात कमी करण्याचे उपाय योजले जातील का?

कारणे शोधून अपघात कमी करण्याचे उपाय योजले जातील का?

परवाचा दिवस मराठी मुलखासाठी कमनशिबी दिवसांपैकी एक ठरला. त्या दिवशी महाराष्ट्राचं दुर्दैव नर्मदा नदीत जाऊन पडलं. इंदूरहून सकाळी साडेसातवाजता अंमळनेरकडे निघालेली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस मध्यप्रदेशातील खालघाट ‘संजयसेतू’ पुलावरुन शंभर फूट खोल नदीच्या पाण्यात गेली.

या बसने सकाळी इंदूर सोडलं तेव्हा बसच्या चालक आणि वाहकासह बसमध्ये बसलेल्या एकाही प्रवाशाला कदाचित हा त्यांच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरु शकेल असे स्वप्नातही वाटले नसेल. पण दुर्दैवाने तसेच घडले. या बसमध्ये 40-45 प्रवासी होते असे सांगितले जाते. या अपघातातील 13 प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत. हे वृत्त लिहून होईपर्यंत उर्वरित सर्व प्रवासी बेपत्ता होते. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. प्रवाशांच्या प्रवासाच्या दुर्दैवी कहाण्या माध्यमात प्रसिद्ध होत आहेत. अंमळनेर येथील एका युवकाने लग्न ठरले होते. त्याच्यावरही काळाने घाला घातला आहे. पुल परिसरात एका युवकाचे घर आहे. पुलाचे कठडे तोडून बस नदीमध्ये कोसळताना मोठाच आवाज झाला. तो ऐकताच त्याने पुलाच्या दिशेने धाव घेतला. तेव्हा त्याला बस नदीपात्रात बुडताना दिसली. ती वेळ इंदूर-अंमळनेर बसची असल्याचे माहित होते. त्याच बसला अपघात झाल्याचा अंदाज बांधून आपण अंमळनेर डेपोला फोन करुन अपघाताची कल्पना दिली असे त्याने माध्यमांना सांगितले. त्यामुळे मदतकार्य वेगाने सुरु होऊ शकले. त्यामुळे काही प्रवाशांचा जीव वाचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृतांचा आकडा वाढू नये अशीच सगळ्यांची इच्छा आहे. पण परिस्थिती अजून स्पष्ट व्हायची आहे. यथावकाश अपघाताची चौकशी केली जाईल. त्यातून कदाचित अपघाताचे कारणही कळू शकेल. सध्या मात्र त्याविषयी वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. पुलावरुन जाताना बसचा वेग जास्त होता, बसचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले, चुकीच्या दिशेने येणार्‍या वाहनचालकाला वाचवण्याच्या नादात बस नदीत कोसळली ही बातम्यांमधून अंदाजीलेली काही कारणे. तथापि एकुणच अलीकडच्या काळात वाहनांचे अपघात वाढत आहेत असे रोज माध्यमातून दिल्या जाणार्‍या बातम्यांतूून वाटत राहाते. राज्यात ठिकठिकाणी पावसाचा कहर सुरुच आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहात आहेत. काही छोटे-मोठे पूल आणि सांडवे पाण्याखाली गेले आहेत. विशेषत: अशा वातावरणात वाहने चालवताना दक्षता बाळगणे गरजेचे असते. सगळेच वाहनचालक तशी दक्षता बाळगतात का? पाण्याखाली गेलेल्या पुलांवरुन किंवा सांडव्यांवरुन वेगाने वाहने नेण्याचा सोस वाढत आहे. त्या प्रमाणात अपघातांची संख्याही वाढती आहे.

औरंगाबादच्या पर्यटकांची चारचाकी गाडी भंडादर्याच्या कृष्णावंती नदीत बुडाली. नागपूरमधील ब्राह्मणमारी नदीवरील पुलावरुन जात असताना चारचाकी गाडीला नदीत जलसमाधी मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील ओसंडून वाहाणार्‍या चिंचोली नाल्यात एक बस अडकली. कल्याणच्या शहाड पुलाजवळ भरलेल्या पाण्यात एक बस अडकली. तारतम्य न बाळगता वाहने चालवण्याच्या नादात स्वत:सह गाडीमधील इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात घालणार्या बेदरकारपणाची ही काही चपखल उदाहरणे. हा बेदरकारपणा किंवा अती धाडस दाखवणे प्रसंगी जीवावर बेतू शकते याचा अंदाज वाहनचालकांना खरेच येत नसेल का? रोज ठराविक रस्त्यांवरुन वाहने नेणार्‍या चालक व वाहकांनाही तो येऊ नये का? निदान पुलावरुन वाहन चालवताना वेग मर्यादित असायला हवा. पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. खड्ड्यांनी भरलेले असतात. रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिकाणी पाणी साचलेली डबकी तयार होतात. याची दखल घेत वाहने चालवणे अपेक्षित असते. तशी सावधानता काही चालक बाळगत नाहीत हे अनुमान अपघातांच्या वाढत्या संख्येवरुन काढणे चूक ठरेल का? याचा एकत्रित विचार करुन योग्य त्या सुचना चालकांना आणि संबंधितांना देणे ही सरकारची जबाबदारी आहे.

अपघात झाल्यावर मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीच्या घोषणा करण्याच्या लगबगीने अपघातातील मृतांच्या परिवारावर अनपेक्षितपणे कोसळलेल्या कुुटुंबियाच्या चिरवियोगाचे दु:ख कसे हलके होणार? कुटुंबातील कर्ता माणूस गेल्याने निर्माण होणारी पोकळी फक्त पैशाने भरुन कशी निघेल? याचा साकल्याने विचार शासन व प्रशासन कधी करते का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com