दुर्घटना रोखण्यातही हितसंबंध आड येत असतील?

दुर्घटना रोखण्यातही हितसंबंध आड येत असतील?

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हंगामी पावसाच्या आगमनाची वाट सगळेच बघतात. त्याच्या आगमनाने लोकांना आनंदही होतो. तथापि मुसळधार पाऊस झाला तर घर सुरक्षित राहिल ना? घराची पडझड तर होणार नाही ना? अशा शंकांनी मुंबईसह राज्यातील अनेकांची झोप उडते. दुर्दैवाने यंदाही मुंबईतील लोकांची भीती खरी ठरली आहे.

हंगामी पावसाळयाचे अजून दोन-अडीच महिने बाकी आहेत. दोन-तीन दिवसाच्या अती पावसाने मुंबईत हाहाकार माजवला आहे. मुंबईची सालाबादप्रमाणे पुन्हा तुंबई झाली आहे. चेंबूर-वाशीनाका परिसरात दरड कोसळून 20 लोकांचे बळी गेले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबईकडे जाणारी आणि बाहेर जाणारी रेल्वेवाहतूक स्थगित झाली आहे. भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्र पावसाच्या पाण्याने जलमय झाले आहे. त्यामुळे तेथील पंपहाऊस आणि इतर यंत्रसामग्री बंद करावी लागली आहे. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागातील लोकांना पुढचे 1-2 दिवस तरी शुद्धीकरण न केलेले पाणी प्यावे लागणार आहे.

मुंबईतील 36 पैकी 25 विधानसभा मतदारसंघातील किमान 300 ठिकाणे दरडीप्रवण असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या भागातील साधारणतः दहा हजार झोपड्या तातडीने स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले होते. त्याचे पुढे काय झाले हे अदयाप गुलदस्त्यातच आहे. हवामान खात्याच्या इशार्‍यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना दक्ष राहाण्याचे आदेश दिले होते.

राज्याच्या कारभार्‍यांनी दिलेले आदेश किती यंत्रणा मनावर घेतात? केवळ यंत्रणेलाच नव्हे तर जनता सुद्धा अशा इशार्‍यांचे गांभीर्य उमजते का? तसे असते तर पुन्हा एकदा दरड कोसळून काही लोकांचे हकनाक जीव गेले असते का? शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी होते की नाही यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा का निर्माण केली जात नाही? अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित का केली जात नाही? जबाबदारी पार पाडण्यात जे अकार्यक्षम ठरतात त्यांच्यावर कारवाई तरी केली जाते का? मुंबई हे जागतिक कीर्तीचे शहर आहे. भारतातील शहरांपैकी मुंबईची प्रतिष्ठा जगात सगळ्यात वेगळी आहे. जागतिक पर्यटकांना मुंबईचे आकर्षण आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी मानली जाते.

मुंबईचा आसरा घेणार्‍यांना हे शहर उपाशी झोपू देत नाही असाही या शहराचा लौकिक आहे. त्या शहराची प्रतिमा मलीन होणे अनेकार्थांनी परवडणारे नाही. त्यासाठी मुंबईचे लोकप्रतिनिधी आणि मुंबई मनपाचे सभासद किती जागरूक असतात? त्यांना जबाबदारीचे भान कोण करून देणार? दरवर्षीच पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते पण गेल्या अर्धशतकातही त्याची आठवण पुनःपुन्हा तुंबई होते त्यावेळीच का यावी? मुंबईची प्रतिमा जपणे ही राज्य सरकारची जबाबदारी असली तरी केवळ मुंबईचाच नव्हे तर राज्याचा लौकिक जपणे ही सर्वच राजकीय पक्षांचीही जबाबदारी आहे. राजकारण करतांना या जबाबदारीचे भान त्यांनाही सतत ठेवावे लागेल. प्रश्न फक्त मुख्यमंत्रानी दिलेल्या आदेशापुरता मर्यादित नाही. एकूणच यंत्रणा शासकीय आदेशांना कात्रजचा घाट का दाखवतात हा आहे.

दप्तरबंद ठेवण्यासाठीच शासकीय आदेश काढले जातात असा सोयीस्कर समज संबंधितांनी करून घेतला असावा का? करोनामुळे राज्यात पर्यटनावर बंदी आहे. तरीही लोक बेफिरकीपणे पर्यटनासाठी बाहेर कसे पडतात? गेल्या 2-3 दिवसात मुंबई परिसरातील विविध धबधब्यांवर अडकलेल्या 300 तरी पर्यटकांची सुटका करण्याची वेळ यंत्रणेवर का आली? जे बेफिकीर लोक नियम मोडून त्यांचा जीव धोक्यात घालतात आणि यंत्रणेलाही कामाला लावतात त्यांच्यावर कारवाई केल्याचे आजवर कोणी ऐकले आहे का? बेजाबदारपणाही अनेक दुर्घटनांना कारण ठरतो हे लोकांनाही लक्षात घ्यावेच लागेल. कारण कोणतीही दुर्घटना घडली की सुरुवातीला त्याचे खापर एकमेकांवर फोडण्याचे पुण्यकर्म करण्याची चढाओढ मात्र लागते. त्याचे पडसाद काही दिवस निनादत राहातात आणि विरून जातात.

नको तिथे धाडस दाखवण्याचा पराक्रम न करण्याचे शहाणपण जनतेला कधीतरी येणार का? शिक्षण वाढत आहे. तसतसे तज्ज्ञ उपदेशक वाढत आहेत. प्रत्येकाला कुठले ना कुठले माध्यम उपलब्ध आहे. तरी शहाणपणाचा पुरेसा विस्तार होण्याला अडथळे तरी कुठे, कसे आणि कोणाकोणाकडून निर्माण होतात? मुंबईसारख्या शहरात कचर्‍याच्या ढिगात सुद्धा अनेकांना लाखोंचो घबाड वर्षानुवर्षे हाती लागते. तसे काही हितसंबंध दरवर्षी कोसळणार्‍या दरड्यांमुळे निर्माण होत असतील का? तेव्हा कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना रोखणे ही सरकार, यंत्रणा आणि जनतेची एकत्रित जबाबदारी आहे याची खूणगाठ सर्वानीच मारलेली बरी!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com