उत्साहाच्या भरात नियमांची पायमल्ली क्षम्य ठरेल का?

उत्साहाच्या भरात नियमांची पायमल्ली क्षम्य ठरेल का?

ववर्षाचे स्वागत करण्याचा रिवाज भारतीय भूमीत चांगलाच रूजला आहे. जुन्या वर्षातील कटू आठवणी विसरून नव्या वर्षात चांगल्या आणि अनुकूल गोष्टी जीवनात घडाव्यात, अशी अपेक्षा सर्वांनाच असते. नववर्ष स्वागताच्या तर्‍हा काळानुरूप बदलल्या आहेत. पाश्‍चात्य संस्कृतीचा प्रभाव त्यावर पडला आहे. मावळत्या 2022 वर्षाला निरोप दिला जाताना आणि नव्या 2023 वर्षाचे स्वागत करताना त्याचा प्रत्यय परवा आला. या काळात समुद्र किनारे, देवालये, पर्यटनस्थळे, हॉटेल्स आदी ठिकाणी सर्वत्र उत्साही लोकांची अनिर्बंध गर्दी झाली होती. मावळत्या वर्षाला निरोप देताना समुद्र किनार्‍यांवर मोठ्या संख्येने लोक जमले होते. तरुणाईचे प्रमाण त्यात जास्त होते. खाण्या-पिण्याची चंगळ करण्यासाठी उपाहारगृहे आणि हॉटेल्सवर खवय्यांची झुंबड उडाली होती. चीन, अमेरिका, सिंगापूर, कोरिया, थायलंड, जपान आदी देशांत करोना संकट पुन्हा उलटले आहे. चीनमध्ये करोना विषाणूचा नवा अवतार सध्या धुमाकूळ घालत आहे. त्याच्या अधिक संसर्गजन्य प्रकाराने बाधित पहिला रुग्ण भारतात गुजरात राज्यात नुकताच आढळला आहे. भारतात तूर्तास करोना भीती नाही, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. तथापि, करोना संसर्गाबाबत गाफिल न राहता सावधगिरी बाळगण्याचे आणि प्रतिबंधक नियम पाळण्याचे कळकळीचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. भारतासाठी पुढील 40 दिवस महत्त्वाचे असल्याचे व या काळात करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने सरकारी पातळीवर खबरदारी घेतली जात आहे, पण ‘थर्टी फस्ट’च्या रंगात रंगलेल्या उत्साहवीरांना नियमांशी सोयरसूतक कसे असणार? त्यांच्या उत्साहाला निर्बंध कोण व कसे घालणार? बेभान झालेल्यांना भानावर कोण आणणार? उत्साहवीरांपैकी किती जणांनी करोना प्रतिबंधक लशींचे दोन डोस आणि नंतर बूस्टर डोस घेतला असेल ते त्यांनाच ठाऊक! महाराष्ट्रात व्यापक प्रमाणात लसीकरण झाले आहे, 95 टक्के नागरिकांनी दोन लशी तर 70 टक्के जणांनी बूस्टर डोस घेतले आहेत, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीयांची, विशेषत: भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे करोनाला घाबरण्याचे काही कारण नाही, असा दावा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात केला. तरीही कोणताही धोका नको म्हणून जनजागृती केली जात आहे, सुरक्षित अंतर पाळणे आणि मास्कचा वापर करणे गरजेचे आहे, निर्बंध पाळून सण, उत्सव साजरे करा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले होते. तथापि मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आसूसलेल्या उत्साहप्रेमींनी ‘महाराष्ट्रातील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही’ एवढेच आरोग्यमंत्र्यांचे विधान ध्यानात घेतले असावे. खबरदारी म्हणून काळजी घ्या, गर्दी टाळा, सुरक्षित अंतर राखा, मास्क वापरा या सूचनांना मात्र सर्वांनी नजरेआड करून नववर्ष स्वागताचा मनमुराद आनंद लुटला. सुरक्षा व्यवस्थेत व्यस्त असलेल्या पोलीस यंत्रणेलाही उत्साहवीरांना आवरणे कठीण झाले असेल. त्यामुळे राज्यभर अनियंत्रितपणे नववर्षाचे स्वागत झाले. देवालयांमध्येही दर्शनासाठी उसळलेल्या गर्दीला  निर्बंधांचा विसर पडला. ही अनियंत्रित आणि बेशिस्त गर्दी पाहून करोना विषाणूसुद्धा कदाचित आनंदला असेल. महाराष्ट्रात पुन्हा हात-पाय पसरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करून दिल्याबद्दल या विषाणूने निर्बंध धाब्यावर बसवणार्‍यांना मनोमन धन्यवादही दिले असतील. लोकांमधील बेशिस्तपणा पाहता यापुढे किमान सहा महिने सर्व प्रकारचे नियम आणि निर्बंध बाजूला ठेवले जातील, असे सरकारनेच जाहीर करायला हवे! आपल्या देशातील नागरिक सरकार किंवा सरकारी यंत्रणा सांगतात त्याच्या अगदी विरुद्ध कृती करतात. किंबहुना तसे करणे हेच आपले कर्तव्य आहे, असे त्यांना वाटत असेल. जे सांगितले जाते किंवा सांगितले गेले त्याच्या उलट कृती करण्याची वा वागण्याची सवय तमाम भारतीयांना जडली आहे. महाराष्ट्र तरी त्याला अपवाद कसा ठरणार?

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com