Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखलसीकरण मोहिम का मंदावली?

लसीकरण मोहिम का मंदावली?

राज्यातील करोना निर्बंध शिथिलीकरणात करोना लसीकरण हा कळीचा मुद्दा ठरु पाहात आहे. अन्य मुद्यांबरोबरच लसीकरणाची स्थिती बघुनच राज्यसरकारने निर्बंध शिशिल केले आहेत. लसीकरण पुरेशा प्रमाणात आढळलेले जिल्हे शंभर टक्के निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत. काही जिल्ह्यात निर्बंध अंशत: शिथिल झाले आहेत. राज्यातील साधारणत: पावणेदोन कोटी लोकांनी करोना लसीची दुसरी मात्रा घेतलेली नाही असे सांगितले जाते. 18 वर्षांवरील आणि किशोरवयीन मुलांमधील लसीकरणाची गती देखील मंदावल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. 15 ते 18 वयोगटातील लसीकरणासाठी पात्र ठरलेल्यांपैकी जेमतेम 30 टक्के मुलांनी लस टोचून घेतली आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल अशी अपेक्षा संबंधितांनी व्यक्त केली आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी नाशिक जिल्ह्यात कालपासून ‘इंद्रधनुष्य’ मोहिम सुरु झाली आहे. करोनाची तिसरी लाट ओसरली असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. करोनाच्या चौथी लाटेची शक्यता कानपूर आयआयटी संशोधकांनी माध्यमांकडे व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी गणिती प्रारुपाचा आधार घेतल्याचे सांगितले. यापुढे करोनाच्या लाटा येतील की नाही याविषयी तज्ञांमध्ये दुमत असू शकते. तथापि करोनाचा विषाणू दीर्घकाळ अस्तित्वात राहील याविषयी मात्र त्यांच्यामध्ये एकमत आढळते. करोना लसीच्या दोन्ही मात्रा टोचून घेणे हाच करोनाला अटकाव करण्याचा सध्याचा उपलब्ध व परिणामकारक पर्याय असल्याचे तज्ञ सांगतात. लस टोचून घेतल्यावरही करोनाचा संसर्ग झाला तरी तो संसर्ग जीवघेणा ठरणार नाही, रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ सहसा येणार नाही आणि करोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाणही घटेल असे तज्ञ सांगत होते. करोनाच्या तिसर्‍या लाटेत त्याचा काही प्रमाणात अनुभव लोकांनी घेतला आहे. त्यामुळे लसीकरण हाच सध्याचा उपलब्ध पर्याय आहे हे लोकांनाही पटले असावे. पण तरीही ‘जे कळते ते वळत’का नसावे? लस टोचून घेण्यासंदर्भात उदासीनता का आली असावी? लसीकरणाअभावी मुलांना शाळेत आणि महाविद्यालयात पाठवण्यास काही पालकांनी विरोध केला होता. त्यानंतर त्यांच्यासाठी लसीकरण सुरु झाले. मोहिमेच्या सुरुवातीला तरुण आणि किशोरवयीन मुलांचा भरभरुन प्रतिसाद होता. तो नंतर हळूहळू का कमी झाला? याचा विचार किती पालक करतील? या वयोगटातील लसीकरणाविषयी पालक साशंक असल्याचे वृत्त माध्यमात झळकले आहे. ते खरे असेल तर पालकांमधील साशंकता संबंधित कशी दूर करणार? करोनाचा भर ओसरला असला तरी समाजमाध्यमांवरील स्वयंघोषित वैद्यकीय तज्ञांचा जोर मात्र कायम असल्याचे आढळते. ‘…..येन केन प्रकारेन प्रसिद्धपुरुषो भवेत्’ या संस्कृत सुभाषिताप्रमाणे त्यांची संख्या वाढतच आहे. प्रसिद्धी आवडणे हा मनुष्यस्वभाव आहे. सध्या समाजमाध्यमांचा इतका धुमाकूळ आहे की, कोणी काहीही खरडावे आणि त्याआधारे समाजमाध्यमावर प्रसिद्ध ‘पुरुष’ म्हणून उगावावे. लसीकरणास पर्याय नाही असे वैद्यकीय तज्ञ घसा फोडून सांगत आहेत. पण घरगुती उपाय करोनाला आटोक्यात आणू शकतात असे छातीठोकपणे समाजमाध्यमांवर सांगणार्‍या तथाकथित वैद्यकीय तज्ञांची व पदव्या मिरवणार्‍या डॉक्टरांची संख्याही कमी नाही. लसीकरणाचा वेग अचानक का मंदावला? करोनाची दहशत कमी झाली असावी का की तथाकथित तज्ञांच्या मनमानी प्रचाराचा तो प्रभाव असावा. तिसरी लाट ओसरली आहे आणि करोनाच्या चौथ्या लाटेची चर्चा समाजमाध्यमांवर देखील सुरु नाही. त्यामुळेही लस टोचून घ्यायची घाई करु नये असे काहींना वाटले असण्याची शक्यता असेल का? लोकांना काय वाटावे आणि जे वाटते ते बरोबर की चूक हा वादाचा मुद्दा ठरु शकेल. तथापि सरकारला मात्र तसे वाटून चालेल का? लस टोचून न घेण्याच्या असंख्य सबबी लोक सांगू शकतात. पण सरकारी मोहिम राबवण्यात सातत्य मात्र राखले जायलाच हवे. करोनाच्या लाटेबरोबर सातत्य कमी-जास्त होणे परवडणार नाही, हा धडा यंत्रणेने नक्की शिकायला हवा.

- Advertisment -

ताज्या बातम्या