लसीकरणातील गोंधळ कोण निस्तरणार?

करोना लस
करोना लस

करोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही. पुन:पुन्हा ती उसळी मारून केंद्र आणि राज्य सरकारांना भेडसावत आहे. दोन महिन्यांनंतर रुग्णसंख्या घटू लागताच राज्य सरकारांनी टाळेबंदीचे नियम शिथील करायला सुरूवात केली आहे. साहजिकच दसरा-दिवाळीच्या खरेदीसारखी तुफान गर्दी रस्ते आणि बाजारपेठांत लोक करीत आहेत.

गर्दी करणार्यांपैकी फार थोडे लोक करोनाविषयक नियमांचे पालन करीत आहेत. लोक तरी बिचारे काय करतील? जवळपास वर्षभर घरकोंडीची स्थानबद्धता अनुभवून ते आंबले आहेत. कदाचित त्यामुळेच संसर्गाची भीती न बाळगता लोक आता बेफिकिर बनले असतील का? नियम पाळणार्यांच्या मनात संसर्गाच्या भीतीने धडकी भरत आहे. नवी रुग्णसंख्या पुन्हा बाळसे धरत आहे. पन्नासचा आकडा शंभरावर तर शंभराचा आकडा दुपटीने वाढत आहे.

महाराष्ट्रात तिसरी लाट केव्हा येईल ते अनिश्चित असले तरी दुसरी लाट उलटण्याचा धाक मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा, राज्य कृती दल आणि जनतेला सावध राहण्याचा इशाराही दिला आहे. देशात लसीकरणात महाराष्ट्र आघाडी टिकवून असला तरी लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने तुटवडा कायम आहे. परिणामी राज्यात सर्वच लसीकरण केंद्रांवर भल्या सकाळी लांबच लांब रांगा लावून लोक सरकारच्या आवाहनास मात्र प्रतिसाद देत आहेत. लशींच्या प्रतीक्षेत तिष्ठत आहेत.

केंद्रांवरील नियोजन ढासळले आहे. उडालेली झुंबड पाहता लसीकरण केंद्रेच करोना संसर्ग फैलावाची वेगवान केंद्रे ठरण्याची भीती तज्ञ व्यक्त करीत आहेत. उत्तर महाराष्ट्रात लसीकरणातील गोंधळ अधिक जाणवतो. नाशिक महानगरात संभ्रम आणि गोंधळाचे अभूतपूर्व चित्र पाहावयास मिळते. जळगावसाठी लस नेली जात असताना त्यातील लसमात्रांची 14 खोकी कळवण तालुक्यात रस्त्यावर नुकसान झालेल्या स्थितीत परवा आढळली. सर्वत्र लसटंचाई असताना अशा तर्हेने लस वाहतुकीतील हलगर्जीमुळे होणार्या नुकसानीला कोण जबाबदार? असेच काही प्रकार इतरत्रही घडले असतील.

संसर्गाचा धोका असताना आंदोलन करण्याची उबळ अनेक राजकीय पक्षांना आली आहे. बेजबाबदारपणाचे हे लक्षण नाही का? लशींबाबत लोक सुरूवातीला साशंक होते. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी तुरळकच दिसत असे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने लसीचे महत्त्व समजल्याने लोक स्वयंस्फूर्तीने लस टोचून घेत आहेत. करोनासंबंधीची औषधे, उपकरणे, लसी आदींचे वाटप केंद्र सरकारने अट्टाहासाने स्वत:कडे ठेवले आहे. मग आत्मनिर्भर होण्याची संधी राज्यांना कशी मिळणार? तिसर्या लाटेतील विषाणूचे स्वरुप अतिशय घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच म्हटले आहे.

लसीकरणाला गती देण्यासाठी अधिक लसपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी राज्य सरकार केंद्राकडे सतत करीत आहे, पण ती दुर्लक्षिली जात आहे. देशवासियांना करोनापासून मुक्ती मिळवून द्यायची असेल तर लसीकरणाबाबत केंद्र सरकारची जागरूकता वाढण्याची गरज आहे. राज्य सरकारांवर जबाबदारी ढकलून आणि पक्षनिहाय दोषारोप करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी लसीकरण आणि लसपुरवठ्यातील गोंधळ थांबवावा लागेल, पण तो कोण? कधी? व कसा थांबवणार? त्यासाठीसुद्धा एखादा आयोग नेमण्याची पाळी येईल का?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com