जनतेला शहाणपण कधी येणार?

जनतेला शहाणपण कधी येणार?

गुजरातमधील मोरबी झुलता पूल दुर्घटनेत बचाव कार्य वेगाने सुरु आहे. अपघाताची जी दृश्ये माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत, होत आहेत ती अस्वस्थ करणारी आहेत. मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. मृतांच्या वारसांना सरकारी मदत जाहीर झाली आहे. या घटनेतून लोकांना सावरायला बराच काळ जावा लागेल. दुर्घटना का घडली याविषयीचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. दुर्घटनाग्रस्त पूल नुतनीकरण करण्यात आले होते. अपघातसमयी पुलावर क्षमतेपेक्षा अधिक लोक होते

. पूल गर्दीने खचाखच भरलेला होता असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. क्षमतेपेक्षा जास्त लोकांना पूलावर जाण्याची परवानगी का देण्यात आली? पूलावर एकावेळी किती लोकांनी जावे याचे काही नियम आहेत का? असलेच तर पर्यटकांना ते माहित करुन देण्याची काही व्यवस्था आहे का? पुलाचा वापर जबाबदारीने करावा याविषयीचे काही फलक लावले गेले आहेत का? प्रशासकीय पातळीवरील बेपर्वा वृत्ती हे देखील अपघाताचे एक कारण असू शकेल का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघाताची चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जायलाच हवी. पण तेवढेच पुरेसे ठरु शकेल का?

या घटनेशी संबंधित एका छायाचित्रात पूलावर प्रचंड गर्दी दिसते. एक चित्रफीतही समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्यात काही मुले पूलावर धुडगूस घालताना दिसतात. झुलत्या पुलाच्या तारांवर लाथा मारतात. अर्थात, हे चित्र नवे नाही. सार्वजनिक सुविधा वापराबाबतची काही लोकांची बेफिकीर वृत्ती ठायीठायी आढळते. लोकांसाठी निर्माण केल्या गेलेल्या सुविधांचा वापर जबाबदारीने करण्याचे भान अनेकांना नसते असाही अनुभव आहे. सिग्नल लाल असताना एक मिनिट थांबल्याने जणू आभाळच कोसळणार असते अशाच आविर्भावात वाहनचालक सिग्नल मोडून पळ काढतात.

एकेरी वाहतुकीचा मार्ग दुहेरी करतात. वाहतुकीचे नियमभंग करणे हा काही वाहनचालकांना त्यांचा हक्कच वाटू लागला असावा असेच त्यांचे वर्तन आढळते. ‘इथे थुंकू नये’ असे आवाहन करणार्‍या फलकावरच लोक थुंकतात. पूलाच्या कठड्याचे गज कापून नेतात. गटारीवरचे ढापे चोरीला जातात. घरातला कचरा घराबाहेर इतस्तत: फेकण्याच्या लोकांच्या सवयीमुळे शहरांमध्ये ठिकठिकाणी कचराकुंड्या तयार होतात. काहीजण एसटी बसच्या सिटवर नावे कोरतात. सिट फाडुनही ठेवतात. पावसाने धरणे भरुन ओसंडली की लोकांना बहुधा पाणी जपून वापरावे लागणार नाही याचाच आनंद होत असावा अशी शंका येण्याइतपत लोकपाण्याची उधळपट्टी लोक करतात.

ही झाली वानगीदाखलची उदाहरणे. जी सामाजिक भान राखण्याचे महत्व वारंवार अधोरेखित करतात. कोणतेही नियम पाळण्यासाठी नसतातच असा माणसांचा भ्रम झाला असावा. पण ते योग्य नाही. समाजात वावरताना सामाजिक सभ्यतेचा अवलंब करावा लागतो. सामाजिक भान राखावे लागते. सार्वजनिक सुविधांचा वापर जबाबदारीने करावा लागतो. नियम पाळणे माणसांच्याच भल्याचे असते याचे भान समाजाला कधी येणार? दुर्घटना घडली की, प्रशासनाला आणि लोकांना तात्पुरते शहाणपण येते.

पण तेवढेच पुरेसे नसते याची जाणीव लोकांना आतातरी होईल का? मोरबी दुर्घटनेनंतर गेल्या वर्षीच्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीतल एक चित्रफीत यानिमित्ताने समाजमाध्यमांवर फिरत आहे. कोणत्याही दुर्घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा उद्योग नेतेमंडळींनी करणेही स्वाभाविक मानले जावे का? लोककल्याणकारी सुविधा निर्माण केल्या जात असतात. तथापि त्यांचा वापर जबाबदारीने करण्याचे शहाणपण लोकांमध्ये कधी येणार?  

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com