भारतीय पर्यटकांचे वर्तन कधी सुधारणार?

भारतीय पर्यटकांचे वर्तन कधी सुधारणार?

दिवस पावसाळी पर्यटनाचे आहेत. काही ठिकाणी पाऊस झाल्याने धरतीने हिरवा शालू पांघरण्यास सुरुवात केली आहे. छोटे छोटे इटुकले पिटुकले ओहोळ वाहाते झाले आहेत. माणसांनी पर्यटन का करावे याचे मार्मिक उत्तर गीतकार शैलेन्द्र यांनी आपल्या काव्यात नमूद केले आहे. ‘इन्सा को दोस्त बनाकर, इन्सासे प्यार कर लो, दुनिया की सैर करलो’ असे गीतकार शैलेन्द्र म्हणतात तर ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्रग्रंथविलोकीत, मनुजा चातुर्य येतसे फार’ असे मोरोपांतांनी म्हटले आहे. तात्पर्य, शहाणपण येण्यासाठी माणसांनी प्रवास करावा असेच त्यांनी सुचवले आहे. तथापि काही माणसे सध्या त्याच्या विरुद्ध वर्तन करतांना आढळतात. शहाणपणाने वागण्याऐवजी वेडेपणाची हद्द सुद्धा पर्यटनात ओलांडणार्‍या माणसांचीच संख्या जास्त वाढत चालली आहे. पर्यटनातून शहाणपण मिळवण्याऐवजी माणसे नेमके काय करतात? जिकडे जातील तिकडे माणूस येऊन गेल्याचे अवशेष सोडतात. जातील तिथे कचरा करतात. प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या इतस्तत: फेकतात. डीजे लावून बेताल-बेसूर गाणी ऐकत त्या तालावर नाचत राहातात. गडकिल्ल्यांच्या दगडांवर, लेण्यांच्या वाटेतील दगडांवर आपली भेट नमूद करुन जणू दगडात अजरामजर होण्याच्या निशाण्या कोरुन ठेवतात. अशांच्या सर्जनशीलतेला स्वच्छतागृहांच्या भिंती देखील कमी पडतात. बंदी घातलेल्या पर्यटनस्थळांवरच गर्दी करणे आणि कायदा मोडणे हा तर लोकांना हक्कच वाटतो. माणसे घातक ठिकाणी सेल्फी काढतात. फुलापानांची नासधुस करतात. चालण्याच्या वाटेच्या दोन्ही बाजूंना दिसणार्‍या शेतातील सळसळती नवी पीके तुडवतात. कुठेही जा ‘पळसाला पाने तीन’ या नियमाप्रमाणे परिस्थिती हीच आढळते. या त्रासामुळेच निसर्गातील अनवट वाटांवर प्रकाश टाकायचा नाही आणि त्या समाजाच्या नजरेस आणायच्या नाहीत असे मत जातीवंत भटके मांडतात. अशा हौशा, नवश्या आणि गवश्यांनी सध्या पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने उच्छाद मांडला आहे. इतका, की त्यांना पर्यटन स्थळी फिरकू न देण्यासाठी बंदोबस्त लावण्याची वेळ पोलीसांवर आली आहे. पर्यटन उन्हाळी असो की पावसाळी. ते रोजगार निर्मितीला पूुरकच ठरते. त्यामुळे माणसांनी पर्यटन करायलाच हवे. तथापि फिरताना ‘सामाजिक भान’ही राखायचे असते याचा विसर पडत चालला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील ग्रामस्थांना सध्या याचा अनुभव येतोय. त्र्यंबकेश्वरजवळील हरीहर किल्ला चढाईसाठी अतिशय अवघड मानला जातो. किल्ल्यावर घेऊन जाणारी वाट अवघड आहे. कातळात कोरलेल्या पायर्‍या थेट अंगावर येणार्‍या आहेत. बर्‍याच जुन्या झाल्यामुळे घासून निसरड्या झाल्या आहेत. सावधानता बाळगत चढाई न केल्यास आणि उतरल्यास कपाळमोक्ष ठरलेला. पण तरुणाईला ते शहाणपण कोण शिकवणार? अशा दुर्गम मार्गांवर पर्यटकांच्या अफाट गर्दीमुळे धोका वाढला आहे. चेंगराचेंगरी होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नाईलाज होऊन अपघात टाळण्याच्या हेतून पोलीसांनी नाकाबंदी सुरु केली आहे. वन कर्मचार्‍यांनी त्यांची गस्त वाढवली आहे. हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना आता परवानगी घ्यावी लागणार आहे. हुल्लडबाजांवर कारवाईचा इशारा पोलीसांनी दिला आहे. धांगडधिंगा घालणार्‍या उतावळ्या पर्यटकांमुळे काजवा महोत्सवावर बंदी घालावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. पर्यटकांच्या अतीउत्साहामुळे ग्रामस्थांना रोजगार देखील नकोसे झाले आहेत. त्यावरुन त्यांना होणार्‍या त्रासाची कल्पना यावी. सुधारायचे नाहीच अशा दृढ निश्चयाने पर्यटन सुद्धा अशक्य करुन सोडणार्‍या पर्यटकांचे वर्तन कधीतरी सुधारणार का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com