समाज अंधश्रद्धामुक्त कधी होईल?

समाज अंधश्रद्धामुक्त कधी होईल?

महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ६१ वर्षे उलटली आहेत. या मराठी मुलखाची पुरोगामी आणि सुधारलेले राज्य म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी अनेक समाजसुधारक, संत, विचारवंत आणि यशवंतराव चव्हाण, वसंदादादा पाटील आणि वसंतराव नाईक आदी आधुनिक भगीरथांनी प्रयत्नांची शर्थ केली व आजच्या स्वरूपातील आधुनिक मानला गेलेल्या महाराष्ट्राची उभारणी केली.

ती ठाशीव ओळख न मानवणारे काही महाभाग बाबा, बुवा आणि माताजी बनून महाराष्ट्राच्या लौकिकावर कलंक लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि एकविसाव्या शतकातही लोक तथाकथित महाराज, बुवा, बाबा आणि बायांच्या नादी लागण्याच्या घटना आजही घडतच आहेत. किंबहुना वाढत आहेत असेही म्हणता येईल.

अत्यंत मेहनतीने मराठी मुलखात रुजवले गेलेले प्रगल्भ विचार बदलण्याचा व समाजाला पुन्हा अंधश्रद्धांच्या काळोखात ढकलण्याचा चंग केवळ स्वार्थी हेतूने या बाबा, बुवा आणि बायांनी बांधला असावा का? समाजात साक्षरता वाढली आहे, त्या साक्षरतेमुळे माणसे सुशिक्षित होतात ही कल्पनाच भ्रामक ठरवली जात आहे का? तसे नसते तर मुंबई-पुण्यासारख्या जागतिक कीर्तीच्या शहरातील माणसे अंधश्रद्धांना बळी पडताना दिसली असती का? तशी शंका यावी अशा काही घटना अलीकडे वरचेवर उघडकीस येत आहेत.

मुंबई शहरात एका बाबाने दोन ज्येष्ठ महिलांना एक कोटी रुपयांचा गंडा घातला. तो बाबा स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेत होता. तो एका पतपेढीचा संचालक-मालक होता. जमा केलेल्या ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याचे आश्वासन तो बुवा कच्छपी लागलेल्या बिनडोक भक्तांना देत असे. त्यातच त्या दोघांनी एक कोटी रुपये गमावले. आता तो बाबा फरार आहे. सांगितल्या पत्त्यावरची पेढी सुद्धा सध्या पोलिसांना कुलूपबंद आढळली आहे. दुसरी घटना मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील पनवेलमध्ये घडली. बंगाली बाबाने नावाने मिरवणार्‍या बाबाने एका तरुणीला पाच लाखांना फसवले आहे. ही तरुणी पेशाने अभियंता म्हणजेच पदवीधर सुशिक्षित आहे.

पुण्यात नुकत्याच घडलेल्या घटनेने सर्वांवर कडी केली आहे. एका तथाकथित बाबाच्या सांगण्यावरून एका कुटुंबातील सर्वानी मिळून एका सुनेला सतत मारहाण केली. अनेकदा चटकेही दिले. त्या सुनेचा पायगुण चांगला नाही. ती घरात असेपर्यंत घरात कुटुंबाला सुख-समाधान लाभणार नाही. संकटे ओढवत राहातील. आर्थिक हानी होत राहील. असे हा बाबाने कुटुंबियांच्या मनावर बिंबवले होते. कुटुंबातील एकालाही त्या बाबाच्या अशा थापांचा हेतू लक्षात आला नाही हा अंधश्रद्धेचा पगडा समर्थनीय म्हणावा का? त्या बाबाच्या सल्ल्यावरून कुटुंबीयांनी केलेला छळ असह्य झाला व त्या सुनेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तिचा नवरा घरातून फरार झाला आहे.

या बाबाला ते कुटुंब राजगुरु सुद्धा मानत असे. पुणे पोलिसांनी आता त्याला बेड्या ठोकल्या आहेत. शिक्षणाने माणसे समजदार होतात, हुशार होतात, चाणाक्ष होतात, विचारवान होतात. हा सगळा त्या कुटुंबातील माणसांनी केवळ शब्दभ्रम ठरवला आहे. शिक्षणप्रसारासाठी पुण्यातच आयुष्य पणाला लावलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सौ. सावित्रीबाई फुले किंवा लोकमान्य टिळक, गोपाळराव आगरकर आदींच्या जीवनकार्यावर बोळा फिरवू पाहणार्‍या वेडपटांची पिढी पुण्यातच निर्माण व्हावी? अशिक्षित माणसेच अंधश्रद्धाळू असतात असा एक शिक्का तथाकथित सुशिक्षितांकडून सरसकट मारला जातो.

पण ती कल्पना सुद्धा थोतांड ठरवणारी माणसे एकविसाव्या शतकात खेड्यापाड्याऐवजी शहरातूनच निर्माण व्हावीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव! पुन्हा एकदा नव्या जोमाने मराठी मुलखाला सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनवण्याचा वसा घेणारी आधुनिक सुधारकांची पिढी महाराष्ट्रात निर्माण होण्याची अशा दुर्दैवी घटना नक्कीच सिद्ध करतात. केंद्र सरकारने शिक्षणात सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. ती समिती अशा दुर्दैवी घटनांची व त्यातून व्यक्त होणार्‍या समाजातील अंधश्रद्धांची गांभीर्याने दखल घेईल व हे चित्र बदलण्यासाठी योग्य उपाय सुचवले अशी अपेक्षा करावी का?

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com