सध्याचा ताण कमी करायला सर्व संबंधितांचे सहकार्य आवश्यक!

सध्याचा ताण कमी करायला सर्व संबंधितांचे सहकार्य आवश्यक!
ओमायक्रॉन’

ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत आहे. सध्याची परिस्थिती सरकारी यंत्रणा आणि सामान्यांवरही ताण वाढवणारी आहे. या ताणातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हा ताण सहन न झाल्याने एका महिलेने तिच्या तीन वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याचे वृत्त माध्यमांत झळकले आहे. या दोघांशिवाय घरातील अन्य दोन सदस्यांनीही तसा प्रयत्न केला होता. तथापि शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस वेळेत पोहोचले आणि दोन जणांचे जीव वाचवण्यात त्यांना यश आले. मायलेकांचा आत्महत्येचा प्रयत्न मात्र तडीस गेला. इहलोकीची यात्रा संपवण्यात मायलेक यशस्वी ठरले. करोनाच्या धास्तीने एक कुटुंब उध्वस्त झाले. राज्यातील चारशे पेक्षा अधिक डॉक्टर्स तर हजाराहून अधिक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईत दोन पोलिसांचा करोनामुळे नुकताच मृत्यू झाला आहे. राज्यात रोज साधारणतः चाळीस हजाराहून अधिक नागरिक करोनाने बाधित होत असल्याचे सांगितले जाते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने निर्बंध कठोर केले असून काही नवे निर्बंधही जाहीर केले आहेत. तथापि ऐंशी टक्क्याहून अधिक रुग्णांमध्ये करोनाची दृश्य लक्षणे मात्र आढळत नाहीत असेही वृत्त झळकले आहे. पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत जमावबंदी आणि रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी मात्र लागू झाली आहे. शाळा, महाविद्यालये आणि शिकवण्या बंदच राहातील. सर्व प्रकारच्या निर्बंधातून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्या आहेत. या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. आरोग्य यंत्रणेलाही सज्ज राहण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यंत्रणेवरचा ताण कमी करण्याचे प्रयत्नही सरकारने सुरु केले आहेत. निर्बंध पाळून नागरिकांनी सरकारी यंत्रणेला साथ द्यावी अशी सरकारची अपेक्षा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुख्यमंत्र्यांनीही ती वारंवार व्यक्त देखील केली होती. साथ तीव्र होईल का? करोनामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या वाढेल का? पुन्हा एकदा टाळेबंदी केली जाईल का? रोजगार बुडेल का? नोकरी जाईल का? अशा अनेक चिंता सामान्य माणसांना भेडसावत आहेत. परिस्थिती सामान्य माणसांनी धास्तावून जावे अशी होत आहे हे खरे. पण त्यातून मार्ग काढण्यासाठी सामान्यांनीही प्रयत्न करायला हवेत याचा विसर पडला तर कसे चालेल? बाजारातील गर्दी कमी होत नाही. अनेक लोक विनाकारण फिरताना आढळतात. तीन-चार प्रकारचे निर्बंध आहेत. ते किती जण पाळतात? तोंडाला मुसके न बांधता लोक फिरतात. सामाजिक अंतर राखत नाहीत. किती लोक हात वारंवार धुवत असतील? निर्बंध पाळणे हा स्वतःसह इतरांनाही सुरक्षित ठेवण्याचा सध्याचा व्यवहार्य मार्ग असल्याचे सांगितले जाते. निर्बंध पाळायचे नाहीत. करोना लसही टोचून घ्यायची नाही. लक्षणे जाणवली तरी त्याकडे दुर्लक्ष करायचे. मग ताण येणे स्वाभाविक नाही का? तो कमी करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलणे निःसंशय गैर आहे. निर्बंधांचे कशोशीने पालन हा देखील ताण कमी करण्याचा एक सोपा उपाय आहे याकडे लोकांचे दुर्लक्ष होतेय का? निर्बंधांचे पालन होते का हे बघण्याची जबाबदारी सरकारने पोलिसांवर सोपवली आहे. लोक त्यांना तरी सहकार्य करतात का? दिल्लीत एक कुटुंब रात्री रस्त्यांवर फिरत होते. पोलिसांनी हटकले. तोंडाला मुसके का बांधले नाही अशी विचारणा देखील केली. याचा राग येऊन त्या कुटुंबातील एकाने खिशातील पिस्तूल काढून जमिनीवर पाच गोळ्या झाडल्या. अशा वेळी पोलिसांनी काय करावे अशी जनतेची अपेक्षा आहे? सध्याची परिस्थिती संयमाने हाताळणे ही संबंधित सर्वच घटकांची जबाबदारी आहे. सरकारी यंत्रणा त्यांचे कर्तव्य बजावत आहे. ओमायक्रॉनचे वार्तांकन करतांना विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी संयम पाळायला हवा. आक्रमकपणे दिलेल्या वृत्ताने जनतेत घबराट पसरते. करोना वृत्त जनतेपर्यंत पोहोचवतांना 'सर्वात आधी'चा मोह टाळता येईल का? लोकांनीही स्वतःच निर्बंध पाळावेत आणि ते पाळण्यासाठी बाध्य करणाऱ्या पोलीस यंत्रणेलाही सहकार्य करावे. यामुळे लोकांवरील ताण काही अंशी निश्चित कमी होऊ शकतो. तथापि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी तज्ज्ञांनी पुढाकार घ्यायला हवा. लोकांना आणि सरकारला वेळोवेळी समयोचित मार्गदर्शन करायला हवे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com