Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने...!

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने…!

माध्यमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काळाबरोबर माध्यमांचे स्वरुपही बदलत आहे. फक्त समाजमामध्यमांवर प्रसिद्ध होणार्या प्रसिद्धी माध्यमांची संख्याही वाढती आहे. चलबोल (मोबाईल) हे अत्याधुनिक संवाद माध्यम. तथापि चलबोलामुळे माध्यमे लोकांच्या खिशात जाऊन बसली. जगभर कुठे काय घडले आहे, घडत आहे हे क्षणोक्षणी लोकांपर्यंत पोहोचू लागले. माध्यमे वाढली, त्यावर प्रसिद्ध केला जाणारा मजकूरही रोज वाढतच आहे. तथापि वाचन मात्र संपुष्टात येत आहे.

चलबोलाच्या अतीवापरामुळे माणसे एकाग्रता गमावत असून विचारांमध्येही उथळपणा येत असल्याचे मत तज्ञ वारंवार व्यक्त करतात. याच उथळपणाचा विपरित परिणाम सखोल वाचन सवयीवर देखील झालेला आढळतो. माणसांचा बहुआयामी व्यक्तीमत्व विकास खुंटला आहे. चलबोल वापरात भारत जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. भारतीय माणूस साधारणपणे दिवसाचे चार-पाच तास चलबोलाचा वापर करण्यात घालवतो असे सांगितले जाते. एवढा वेळ माणसे रोज चलबोलाचा वापर करत असतील तर वाचनाला वेळ तरी किती आणि कुठून मिळणार? तथापि माणसाचे व्यक्तिमत्व वाचनाशिवाय समृद्ध होऊ शकत नाही.

- Advertisement -

चांगला माणूस होण्याची प्रक्रिया वाचनामुळे बळकट होते. पुस्तके माणसांना प्रेरणा देतात. आव्हानांवर मात करण्याचे, संकटांना सामोरे जाण्याचे मार्ग सुचवतात. लढण्याची हिंमत देतात. ‘आम्हा घरी धन शब्दांचिच रत्ने। शब्दांचिच शस्त्रे यत्ने करू । शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन जनलोका’ अशा शब्दात तुकाराम महाराजांनी शब्दांचे पर्यायाने वाचनाचे महत्व सांगितले आहे. ‘ग्रंथ हेच गुरु’ हा संदेश सर्वच संतांनी दिला आहे.

वाचनसंस्कृती उणावत आहे हे खरे. तथापि अनेक संस्था आणि काही व्यक्तीसमूह ही उणीव दाखवून थांबत नाहीत. त्यावर मात करण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेतात. वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहातात. कुसुमाग्रज प्रतिष्ठान त्यापैकीच एक. प्रतिष्ठानतर्फे गेली 10-12 वर्षे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम राबवला जातो.

विश्वास ज्ञान प्रबोधिनी संचलित यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाने ‘माझी पुस्तक पिशवी’ (माय बुक बास्केट) हा उपक्रम नुकताच सुरु केला आहे. वाचकांनी यशवंतराव चव्हाण ग्रंथाययाला भेट द्यावी. तिथे त्यांना एक पिशवी दिली जाईल. वाचकांनी आपल्या आवडीची 10 पुस्तके निवडावीत आणि घरी नेऊन वाचावीत. तीन महिन्यांच्या कालावधीत बदलून न्यावीत. हे या उपक्रमाचे स्वरुप आहे. याच संस्थेने वाचकांनी दिवाळीचा साहित्य फराळ वाटावा असे आवाहन केले आहे.

अनेक वाचनप्रेमी पुस्तके खरेदी करतात. एकदा वाचून झाले की कपाटात ठेऊन देतात. यंदाच्या दिवाळीत अशी काही पुस्तके वाचकांनी यशवंतराव चव्हाण ग्रंथालयाला दान करावीत. असे झाल्यास वाचकांच्या आवडीची पुस्तके अनेक वाचनप्रेमींपर्यंत पोहोचतील. पुस्तके खर्या अर्थाने वापरात येतील. अशी हा उपक्रम सुरु करणारांची अपेक्षा आहे; ‘ग्रंथ तुमच्या दारी, पुस्तक पिशवी आणि साहित्य फराळ’ या तीनही संकल्पना विनायक रानडे यांच्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील एक शिक्षक ‘डॉ. कलाम फिरता वाचनकट्टा’ चालवतात. शाळेच्या दालनात, विद्यार्थ्यांच्या घराच्या ओट्यावर, समाजमंदीरात त्यांचा वाचनकट्टा भरतो आणि मुले वाचनाचा आनंद लुटतात. संगमनेरचे एक प्रयोगशील शिक्षक संदीप वाकचौरे यांनी टाळेबंदीच्या काळात व्हॉटसअ‍ॅपवर ‘बालवाचनालय’ नावाचा उपक्रम सुरु केला.

तो आजही सुरु आहे. या वाचनालयात सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना वेगवेगळी पुस्तके उपलब्ध करुन दिली जातात. मुले आणि विशेषत: तरुण पिढी वाचत नाही असे सरसकट बोलण्याचा प्रघात पडला आहे. तथापि त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर वाचक त्याला प्रतिसाद देतात हा वर उल्लेख केलेल्या उपक्रमकर्त्यांचा अनुभव आहे. लोकांमधील उणीवांवर बोट ठेवण्यापेक्षा चांगल्या उपक्रमांचा प्रारंभ करुन विधायक कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संकल्पना इतर अनेकांनाही प्रेरणादायक ठरु शकते. यावरुन अनेकांनी प्रेरणा घेतली तर समाजाला मार्गदर्शक ठरतील अशा नव्या नव्या कल्पना प्रत्यक्षात येऊ शकतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या